महापालिका क्षेत्रातील ३०५ रस्त्यांवरील कामांना सुरुवात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2016

महापालिका क्षेत्रातील ३०५ रस्त्यांवरील कामांना सुरुवात

मुंबई / प्रतिनिधी
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात आज संपन्न झालेल्या परिमंडळीय उपायुक्तांच्या बैठकीत महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांची कामे सर्वेाच्च प्राधान्याने करावीत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच प्रमुख अभियंता (रस्ते) संजय दराडे यांना दिले होते. त्यानुसार सध्या महापालिका क्षेत्रात ३०५ रस्त्यांवरील कामे सुरु झाली आहेत. ज्या रस्त्यांवरची कामे सुरु आहेत त्या कामांच्या ठिकाणी संबंधित परिमंडळीय उपायुक्तांनी अचानकपणे भेटी द्याव्यात व तेथील कामांची गुणवत्ता व गती यांची पाहणी करावी आणि उणिवा आढळल्यास त्याबाबत तातडीने प्रमुख अभियंता (रस्ते) यांना उचित कार्यवाहीसाठी कळवावे, असे आदेश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले आहेत.

महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात आज संपन्न झालेल्या परिमंडळीय उपायुक्तांच्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह सर्व ७ परिमंडळांचे उपायुक्त उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर विभागात सध्या ८३ रस्त्यांवर कामे सुरु आहेत. यामध्ये बॅरिस्टर नाथ पै मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जी. डी. आंबेकर मार्ग, रजनी पटेल चौक, सिद्धीविनायक चौक, न. चि. केळकर मार्ग, प्रबोधनकार ठाकरे मार्ग यासारख्या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.

पूर्व उनगरांमध्ये सध्या ८८ महत्त्वाच्या रस्त्यांवर कामे सुरु आहेत. यामध्ये कोहिनूर रुग्णालय मार्ग, लल्लूभाई कंपाऊंड मार्ग, घाटकोपर मानखूर्द लिंक रोड यासारख्या मार्गांचा समावेश आहे. तर पश्चिम उपनगरांमध्ये १३४ रस्त्यांवर कामे सुरु आहेत. यामध्ये स्वामी विवेकानंद मार्ग, ना. सी. फडके मार्ग, श्रद्धानंद मार्ग, वीरा देसाई मार्ग यासारख्या मार्गांचा समावेश आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर जिथे कामे सुरु असतील, त्या सर्व ठिकाणी सुयोग्यप्रकारे बॅरिकेट्स बसविणे व त्यावर कंत्राटदाराच्या नावासह काम सुरु होण्याची तारीख व काम पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख नमूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची पाहणी देखील परिमंडळीय उपायुक्तांनी त्यांच्या पाहणी दौ-यादरम्यान करावी, असेही आदेश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले आहेत.

Post Bottom Ad