नागरिकांच्या सोयीसाठी ०२२ – २२६९४७२५ / २७ हे संपर्क क्रमांक
मुंबई / प्रतिनिधी
ऑक्टोबर १९९९ मध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची सुरुवात झाली. त्यानंतर जानेवारी २००१ मध्ये या कक्षातील '१९१६' हा विशेष दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित झाला. तेव्हापासून आजतागायत हा कक्ष व तेथील संपर्क यंत्रणा अक्षरशः एका क्षणाचीही विश्रांती न घेता तब्बल पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ अव्याहतपणे चालू आहे. नागरी सेवा सुविधा विषयक तक्रारी आणि आपत्कालीन परिस्थितीच्या माहितीसाठी '१९१६' या दूरध्वनी क्रमांकाचा मुंबईकरांना नेहमीच आधार वाटत आला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे स्थानांतरण होणार असल्याने दि. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत '१९१६' हा दूरध्वनी क्रमांक तात्पुरत्या स्वरुपात बंद असणार आहे. तथापि, या कालावधीत ०२२ – २२६९४७२५ / २७ हे दोन दूरध्वनी क्रमांक पर्यायी स्वरुपात चालू राहतील, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाद्वारे देण्यात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची सुरुवात सुमारे १७ वर्षांपूर्वी ऑक्टोबर १९९९ मध्ये झाली होती. तेव्हापासून हा कक्ष मुंबईकरांच्या सेवेसाठी आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास (24 x 7) अव्याहतपणे कार्यरत आहे. या सुमारे १७ वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाद्वारे नागरी सेवा सुविधा विषयक लक्षावधी तक्रारी हाताळण्यात आल्या आहेत. तसेच अनेक आपत्कालीन घटनांचेही सुव्यवस्थापन महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाद्वारे समर्थपणे करण्यात आले आहे.
गेल्या सुमारे सतरा वर्षांच्या कालावधीत मुंबईतील दुर्दैवी बॉम्बस्फोट, मुंबईवरील अतिरेकी हल्ला, इमारत वा आगीच्या दुर्घटना, पूर परिस्थिती सारख्या अनेक बाबी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाद्वारे सक्षमपणे हाताळण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण करु शकतील अशा अफवांना वेळीच लगाम घालण्याचे आव्हानात्मक काम देखील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने चोखपणे पार पाडले आहे. या सर्व बाबींची दखल घेऊनच महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे देखील गौरविण्यात आले होते.
मुंबई महापालिकेच्या अव्याहत सेवेचे ठळक प्रतिक असणारा व महापालिका मुख्यालयातील तळघरात असणारा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आता अत्याधुनिक यंत्रणेसह याच इमारतीत दुस-या मजल्यावरील अधिक विस्तीर्ण जागेत स्थानांतरित होत आहे. या स्थानांतरणासाठीची तांत्रिक गरज म्हणून गुरुवार, दि. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंतच्या आठ तासांच्या कालावधीदरम्यान आपत्कालीन कक्षाचा '१९१६' हा दूरध्वनी क्रमांक तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पंधरा वर्ष आणि ९ महिन्यांच्या अव्याहत सेवेनंतर केवळ ८ तासांसाठी हा क्रमांक तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात येणार आहे.
'१९१६' या विशेष दूरध्वनी क्रमांकाशी एकूण ३० लाईन्स जोडलेल्या असल्याने या क्रमांकावर एकाचवेळी ३० नागरिक संपर्क साधू शकतात. मात्र स्थानांतरणाच्या ८ तासांच्या कालावधी दरम्यान '१९१६' हा क्रमांक तात्पुरत्या स्वरुपात बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांना गैरसोय हाऊ नये, यासाठी कक्षातील ०२२-२२६९४५२५ आणि ०२२- २२६९४५२७ हे दोन दूरध्वनी क्रमांक पर्यायी स्वरुपात संपर्कासाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील नागरिकांना त्यांच्या तक्रारी व सूचना नोंदविण्याची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे.
तरी याबाबींची नोंद घेऊन सदर ८ तासांच्या कालावधीत नागरिकांनी आपत्कालीन परिस्थिती प्रसंगी वा नागरी सेवा सुविधा विषयक तक्रारींसाठी ०२२-२२६९४५२५ आणि ०२२- २२६९४५२७ या क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.