गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे ६१ टक्के अधिक पाऊस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2016

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे ६१ टक्के अधिक पाऊस

मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात महापालिकेची ६० स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत या केंद्रांद्वारे पाऊस, हवेचा दाब, हवेची दिशा, तापमान आदी हवामान विषयक माहिती संगणकीय पद्धतीने नोंदविली जाते. विशेष म्हणजे दर १५ मिनिटांनी अद्ययावत होत असलेली ही माहिती आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या ''dm.mcgm.gov.in'' या संकेतस्थळाद्वारे आणि “Disaster Management MCGM” या मोबाईल ऍपद्वारे नागरिकांना थेटपणे उपलब्ध असते. या माहितीनुसार २०१५ च्या तुलनेत २०१६ च्या पावसाळ्यात सुमारे ६०.९३ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला. २०१५ मध्ये १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीदरम्यान सरासरी १५१६.४७ मिमि एवढा पाऊस पडला होता. तर २०१६ मध्ये याच कालावधी दरम्यान २४९१.८८ मिमि एवढा सरासरी पाऊस नोंदविण्यात आला आहे. ही बाब लक्षात घेता गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाळ्यात ६४.३२ टक्के पाऊस जास्त झाला आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात २०१५ च्या पावसाळ्यातील १२० दिवसांपैकी ७८ दिवस पाऊस पडला होता. तर २०१६ च्या पावसाळ्यातील १२० दिवसांपैकी ९९ दिवस पाऊस पडला होता, ही बाब देखील आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे. गेल्यावर्षी शहर विभागात १५३१.४ मिमि एवढा पाऊस नोंदविण्यात आला होता. तर या वर्षी शहर विभागात २३६५.७६ मिमि एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे. गेल्यावर्षी पूर्व उपनगरांमध्ये १५२५.१ मिमि एवढा पाऊस नोंदविण्यात आला होता. तर यावर्षी पूर्व उपनगरांमध्ये २५१४.६९ मिमि एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे. गेल्यावर्षी पश्चिम उपनगरांमध्ये १४९२.९ मिमि एवढा पाऊस नोंदविण्यात आला होता. तर यावर्षी पश्चिम उपनगरांमध्ये २५९५.१८ मिमि एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यादरम्यान महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक पाऊस 'टी' विभागात २८१५.४० मिमि एवढा नोंदविण्यात आला आहे. टी विभागामध्ये मुलुंड (पूर्व व पश्चिम), नाहूर गाव आदी परिसरांचा समावेश होतो. यावर्षीच्या पावसाळ्यात तुलनेने सर्वात कमी पाऊस 'ए' विभागात २०७४.७० मिमि एवढा नोंदविण्यात आला आहे. ए विभागामध्ये कुलाबा, फोर्ट, कफ परेड, नरीमन पॉइंट, गेटवे ऑफ इंडिया आदी परिसरांचा समावेश होतो.

Post Bottom Ad