मुंबई | प्रतिनिधी - 21/11/2016
मुंबई विद्यापीठाने यावर्षी सुरु केलेल्या समाजकार्य एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचे पहिले शिबीर रायगड जिल्ह्यातील जांभुलपाडा परिसरातील आदिवासी पाड्यांवर आयोजित केले आहे.
एक आठवड्याच्या या शिबिरात ३ आदिवासी वाड्यांच्या गरजा शोधून त्यावर प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखला जाणार आहे. काल सोमवारी गटविकास अधिकारी, सरपंच, स्वयंसेवी कार्यकर्ते आणि आदिवासी नेते मंडळी यांच्या उपस्थितीत या शिबीराचे उदघाटन करण्यात आले असून २७ नोव्हेंबर रोजी सांगता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय देशमुख यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाटन करून होईल. या दरम्यान आदिवासी युवकांसाठी रोजगार कार्यशाळा, जांभुळपाडा आणि पंचक्रोशीतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी, दहावीनंतर काय? या विषयावर मार्गदर्शन शिबीर, आदिवासी पाड्यातील पाय वाटेचे दुरुस्तीकरणं, पथनाट्य, वस्ती संशोधन आणि आदिवासी महिला गटांना सक्षम करून रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण असे विविध उपक्रम आयोजिले आहेत. ३५ विद्यार्थी आणि ३ शिक्षक मिळून वरील कार्यक्रम या अभ्यासक्रमाचे समन्वयक तथा राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ चंद्रकांत पुरी यांचे मार्गदर्शनाखाली राबवतील.