महापालिकेच्या अत्याधुनिक आपत्कालीन कक्षामुळे मुंबईकरांना तत्काळ मदतीची सुविधा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2016

महापालिकेच्या अत्याधुनिक आपत्कालीन कक्षामुळे मुंबईकरांना तत्काळ मदतीची सुविधा - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 28 Nov 2016:
मुंबई सारख्या अत्याधुनिक शहराला आवश्यक असलेली आपत्कालीन व्यवस्था महापालिकेने उभी केली आहे. शहरात साधारण पाच हजार सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याद्वारे सध्या शहरातील गुन्हेगारी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात आहे. आता मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षालाही सीसीटिव्हीची जोडणी देण्यात आली असून, त्याचा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी लाभ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुंबई महापालिका मुख्यालयात स्थानांतरित अद्ययावत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केळकर, खासदार राहूल शेवाळे, आमदार राज पुरोहित, मुंबई महापालिका आयुक्त अजोय महेता, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई शहराला स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर बनविण्यासाठी महापालिके मार्फत अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.शहरातील समुद्र किनारे निर्मल करणे गरजेचे आहेत. मनपाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा महत्वाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे हे जाळे मुंबईत निर्माण झाल्यानंतर शहरातील समुद्र किनारे निश्चित निर्मल होऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रभावी पूर्वतयारी, आपत्तीनंतर तातडीची उपाययोजना व हानीचे प्रमाण कमी करत जाणे या बाबी आपत्ती व्यवस्थापन करताना लक्षात घेणे आवश्यक असते.मुंबई महापालिकेच्या अत्याधुनिक आपत्ती नियंत्रण कक्षात यासर्व दृष्टीने यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मुंबई शहराला याची नितांत आवश्यकता होती. आता त्याची पूर्तता झाल्याने आपत्ती काळात मुंबईकरांना तातडीने प्रतिसाद व मदत उपलब्ध होऊ शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या कामाचे संयुक्त राष्ट्रसंघानेही कौतुक केले असून ते मुंबईकरांसाठी अभिमानास्पद आहे. महापालिकेच्या अत्याधुनिक आपत्कालीन कक्षामुळे मुंबईचा प्रत्येक परिसर मुंबई महापालिकेच्या नियंत्रणाखाली आला आहे. तथापि, अशा यंत्रणेच्या उभारणीबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, याचे प्रशिक्षण लोकांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या शाळेतून विद्यार्थ्यांना आपत्कालीन काळातील प्राथमिक उपाययोजनांचे प्रशिक्षण उपलब्ध करुन द्यावे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपत्कालीन उपाय योजनांचा सर्वदूर प्रचार होऊ शकेल, असे ते म्हणाले.

Post Bottom Ad