मुंबईकरांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका समर्थ - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 November 2016

मुंबईकरांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका समर्थ - उद्धव ठाकरे

मुंबई 21/11/2016 -‘धकाधकीचे जीवन असणाऱया नागरिकाला शहरात मुक्त आयुष्य जगता आलं पाहिजे, याकरीता विकासाची अनेक स्वप्नं पाहिली आहेत. ही स्वप्नं पूर्ण करण्याकरीता कामांची धडाडी कायम ठेवा. बृहन्मुंबई महापालिका प्रशासन याकरीता समर्थ आहे,’ असे कौतुकोद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.
बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबई मलनिःसारण प्रकल्प टप्पा - २ अंतर्गत कुलाबा येथील ‘कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्र’चे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली (दिनांक २१ नोव्हेंबर, २०१६) दुपारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

या समारंभास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, महापालिका आयुक्त अजोय मेहता, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर, बाजार व उद्याने समिती अध्यक्षा यामिनी जाधव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, नगरसेवक गणेश सानप, सुरेंद्र बागलकर, संपत ठाकूर, नगरसेविका किशोरी पेडणेकर, युगंधरा साळेकर, उपआयुक्त (अभियांत्रिकी) राजीव कुकनूर, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिःसारण प्रकल्प) सतीश नारकर, ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह शिवसेना उपनेते राजकुमार बाफना, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ व्यासपीठावर उपस्थित होते. विविध नगरसेवक, नगरसेविका, नागरिक व संबंधित अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषणांत म्हणाले की, गत काही वर्ष सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या कामांचा पाठपुरावा करण्यात येतो आहे. बाह्य सल्लागाराची मदत न घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्राचे काम मार्गी लावले, याकरीता त्यांचे कौतुक केले पाहिजे. सर्वसामान्य माणूस हा सर्वात शक्तिमान असतो. मुंबई हे शहर बलिदानातून मिळाले असून येथील सर्वसामान्यांच्या या बलिदानाची जाणीव ठेवून आम्ही विकासाची स्वप्नं पाहत असतो. ही स्वप्नं सत्यात उतरविण्याची धडाडी आणि समर्थता महापालिका प्रशासनामध्ये असून त्याचे प्रतीक म्हणजे कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्राची निर्मिती होय, असे ठाकरे यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले की, विदेशात जलसाक्षरता सर्वत्र आढळते. कारण पाणी बनवता येत नाही, ते वाचवता येते, याची जाणीव तेथे मुरलेली आहे. तिथे पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा तीनदा उपयोग केला जातो. मुंबईतल्या पूर्व किनाऱयावर जागतिक दर्जाचे मत्स्यालय, रेसकोर्सच्या मैदानावर सर्वसामान्यांसाठी मोकळीक देणारं उद्यान आणि समुद्राचा स्वच्छ किनारा व स्वच्छ पाणी ही स्वप्नं प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे उद्धव ठाकरे अखेरीस म्हणाले.

Post Bottom Ad