मुंबई : बेस्ट बसमधून विद्यमान नागरसेवकांप्रमाणेच आता माजी नगरसेवकांनाही मोफत प्रवास करण्यास मिळणार आहे. शिवसेनेचे महिराजउद्दीन शेख यांच्या ठरावाच्या सूचनेला मंगळवारी पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. भाजपाने या प्रस्तावाला विरोध केला असला तरी सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. बेस्ट आर्थिक तोट्यात असताना, महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना हा प्रस्ताव मंजूर केल्याने याबाबत उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे.
नगरसेवकपदाचा कालावधी संपल्यानंतरही विभागातील नागरिक सतत त्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे नगरसेवक नसतानाही त्यांना नागरिकांच्या कामानिमित्त महापालिकेचे मुख्यालय, रुग्णालये तसेच खात्यांच्या कार्यालयात जावे लागते. यासाठी त्यांना बेस्ट उपक्रमांच्या बेस्ट गाड्यांतून प्रवास करताना स्वत:चे पैसे खर्च करावे लागतात. उत्पन्नाचे स्त्रोत नसल्यामुळे माजी नगरसेवकांना असा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे माजी नगरसेवकांना बेस्ट उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत द्यावी, अशी ठरावाची सूचना शेख यांनी २९ सप्टेंबर रोजी मांडली होती. ही ठरावाची सूचना मंगळवारी सभागृहात चर्चेला आली. या सूचनेला भाजपा वगळता इतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. आमदार-खासदारांचे मानधन वाढते. त्यांना बेस्टमधून मोफत प्रवास दिला जातो. मग माजी नगरसेवकांना का नको? त्यांनाही बेस्टमधून मोफत प्रवास द्यायला हवा, असे सांगत सपाचे याकूब मेनन यांनी ठरावाच्या सूचनेला पाठिंबा दिला. भाजपाचे दिलीप पटेल यांनी मात्र विरोध केला. ते म्हणाले, आमदार, खासदारांना बेस्टमधून मोफत प्रवास मिळतो हे खरे असले तरी त्याचे पैसे राज्य सरकारकडून दिले जातात. बेस्ट आर्थिक तोट्यात असताना ही सवलत दिल्यास ते पैसे देणो बेस्ट प्रशासनाला शक्य आहे का? असा सवाल करीत हरकतीच्या सूचनेला त्यांनी विरोध केला. भाजपाचे मनोज कोटक यांनीही ही मागणी योग्य नसल्याचे सांगितले. मात्र बहुमताच्या जोरावर या ठरावाच्या सूचनेला महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी दिली.