मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बस प्रवर्तनात दरवेळी बदल करण्यात येतो. याच प्रमाणे १ डिसेंबरपासून विविध बदल करण्यात येत आहेत. यामध्ये नवीन बस मार्ग, सर्वसाधारण बस मार्गांवर अंशत: बदल, जलद सेवा व काही बस मार्गांचे परावर्तन करण्यात येणार आहे. तसेच ज्या मार्गावर प्रवाशांचा अत्यंत अल्प प्रतिसाद आहे, असे बस मार्ग बंद करण्यात येणार आहेत.
बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार वातानुकूलित बस मार्ग क्र. ए-७0 जलद (मंत्रालय बस स्थानक ते मीरा रोड स्थानक), वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस-४५८ (मुलुंड आगार ते प्रबोधनकार ठाकरे नगर बस स्थानक दरम्यान घोडबंदर रोड-ठाणे आणि दहिसर मार्गे), वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस ५0३ (वडाळा आगार-कळंबोली दरम्यान राणी लक्ष्मीबाई चौक-सायन, देवनार आगार, सीबीडी बेलापूर जंक्शन मार्गे) हे नवीन बस मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. या बस मार्गांवरील बसगाड्या २५ ते ३0 मिनिटांच्या कालावधीने चालवण्यात येणार आहेत.
वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस-५ वांद्रे (पू) बस स्थानक आणि कॅडबरी जंक्शन-ठाणे दरम्यान चालवण्यात येणारी बस कॅडबरी जंक्शन येथून घोडबंदर मार्गावरून हिरानंदानी इस्टेट-ठाणे पर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस ४२२ मुलुंड (प) चेकनाका बस स्थानक आणि आगरकर चौक अंधेरी (पूर्व) दरम्यान प्रवर्तित होणार्या या बस मार्गाचा मुलुंड (प) बस स्थानक येथून कॅडबरी जंक्शन-ठाणेपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. कॉरिडॉर बस मार्ग क्र. ६ जलद इलेक्ट्रिक हाऊस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (चेंबूर) दरम्यान पूर्व मुक्त मार्गावरून प्रवर्तित होणार्या या बस मार्गाचे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक व इलेक्ट्रिक हाऊस दरम्यानचे प्रवर्तन रद्द करून हा बस मार्ग डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथून मादाम कामा मार्गे मंत्रालयापर्यंत जाणार आहे. यापुढे हा बस मार्ग मंत्रालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (चेंबूर) दरम्यान पूर्व मुक्त मार्गे सकाळ-संध्याकाळ चालवण्यात येणार आहे. वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस ७00 बोरिवली स्थानक (पूर्व) ते ठाणे स्थानक (पूर्व) हा बस मार्ग यापुढे मुलुंड आगार ते बोरिवली स्थानक (पूर्व), वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस ७0७ सात बंगला बस स्थानक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक-भाईंदर(पू) हा बस मार्ग यापुढे सांताक्रुझ आगार ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक-भाईंदर (पू), वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस-२ नेहरू तारांगण ते मीरा रोड स्थानक (पू) हा बस मार्ग यापुढे दहिसर तपासणी नाका ते मीरा रोड स्थानक (पू) दरम्यान चालवण्यात येणार आहे. या बस मार्गावरील बसगाड्या सोमवार ते शनिवार सकाळी व संध्याकाळी २0 ते २५ मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी प्रियदर्शनी चौक येथील वाहतूक नियमनात बदल केल्यामुळे बस मार्ग क्र. ५८, बस मार्ग क्र. ५९, बस मार्ग क्र. ६0, बस मार्ग क्र. ८५, बस मार्ग क्र. ३५५, बस मार्ग क्र. ३५७, बस मार्ग क्र. ३९३, बस मार्ग क्र. ४५७ यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
बस मार्ग क्र. ५२४ मर्यादित बोरिवली स्थानक (पूर्व) आणि एपीएमसी मार्केट वाशी सेक्टर १९ दरम्यान धावणार्या बस मार्गावर दुपारच्या वेळेस बोरिवली मार्केट (पूर्व) आणि वाशी बस स्थानक दरम्यान प्रवर्तित होणार्या बस फेर्या यापुढे संपूर्ण दिवसाकरिता बोरिवली स्थानक (पूर्व) ते एपीएमसी मार्केट वाशी सेक्टर १९ दरम्यान चालवण्यात येणार आहे. वातानुकूलित बसमार्ग क्र. एएस १ बॅकबे आगार ते कॅडबरी जंक्शन-ठाणे दरम्यान प्रवर्तित होणार्या या बस मार्गावर दुपारी बारा ते ३ वाजेपर्यंत वडाळा आगार ते कडबरी जंक्शन ठाणे दरम्यान बस फेर्या प्रवर्तित करण्यात येत आहेत. वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस ३ नेहरू तारांगण ते कॅडबरी जंक्शन-ठाणे आणि वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस ४ बॅकबे आगार आणि ओशिवरा आगार दरम्यान प्रवर्तित होणार्या या बस मार्गाचे प्रवर्तन फक्त सकाळ व संध्याकाळ कार्यरत होते. आता ते संपूर्ण दिवसाकरिता चालवण्यात येणार आहे.
याशिवाय बस मार्ग क्र. २४१ वडाळा आगार ते मालवणी आगार आणि बस मार्ग क्र. ३५९ मर्यादित हिरानंदानी बस स्थानक ते मालवणी आगार दरम्यान चालवण्यात येणार्या बस मार्गावर २ जादा फेर्या चालवण्यात येणार आहेत. तसेच बस मार्ग क्र. ४५६ शिवशाही प्रकल्प ते मालवणी आगार, बस मार्ग क्र. ४८५ घाटकोपर बस स्थानक ते मालाड आगार आणि बस मार्ग क्र. एएस ७२ राणी लक्ष्मीबाई चौक ते स्वा. सावरकर चौक या बसेस फक्त रविवारी बंद करण्यात आल्या आहेत. तर वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस ७१ मच्छीमार नगर माहिम ते मीरा रोड स्थानक (पूर्व), वातानुकूलित बस मार्ग क्र. एएस ५१४ मुलुंड बस स्थानक ते माईंड स्पेस, ऐरोली या बसगाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे ते पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. बेस्टच्या प्रवाशांनी बस मार्गामधील बदलाची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.