पत्रकारांची सुरक्षा आणि स्वातंत्र्याला प्राधान्य - न्या. सी.के. प्रसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2016

पत्रकारांची सुरक्षा आणि स्वातंत्र्याला प्राधान्य - न्या. सी.के. प्रसाद

मुंबई, दि. 29 Nov 2016 : पत्रकारितेचे व्रत अंगिकारताना पत्रकारांची सुरक्षा आणि स्वातंत्र्य जपणे हा प्राधान्याचा विषय आहे. मात्र स्वातंत्र्याची अपेक्षा करताना पत्रकारांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या. सी. के. प्रसाद यांनी आज येथे केले. 
मुंबई प्रेस क्लबतर्फे ‘डिजीटल युगातील पत्रकारिता आणि स्वातंत्र्य’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी न्या. प्रसाद बोलत होते. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य एस. एन. सिन्हा, के. अमरनाथ, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष कुमार केतकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

न्या. प्रसाद यावेळी म्हणाले की, पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर होणारे हल्ले चिंताजनक असून पत्रकारांच्या सुरक्षेला व स्वातंत्र्याला कौन्सिलने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पत्रकारांच्या सुरक्षेबरोबरच त्यांची आर्थिक सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. श्रमिक पत्रकारांसाठी राष्ट्रीयस्तरावर कल्याण निधी स्थापन करण्याची आवश्यकता असून निवृत्तीनंतर पत्रकारांना या कल्याण निधीतून ठराविक रक्कम देता येईल, यासाठी पंतप्रधान आणि केंद्रिय माहिती प्रसारण मंत्र्यांशी चर्चा केली आहे, असेही न्या. प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासंदर्भात राष्ट्रीय कायदा करणे आवश्यक असून यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सदस्य सिन्हा यावेळी सांगितले. सदस्य के. अमरनाथ यांनी लोकशाही देशातील पत्रकारीतेचे स्वातंत्र्य यावर विस्तृत भाष्य केले.

माहिती व जनसंपर्कचे सचिव ब्रिजेश सिंह यावेळी म्हणाले की, पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासंदर्भात पत्रकार संरक्षण कायदा तयार करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यवाही सुरु आहे. डिजीटल युगामध्ये लिखाणाचे स्वरुपच बदलले असून सोशल मिडीयावर केलेल्या ट्विटमध्ये देखील बातमी असते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान हे डिजीटल युगात आवश्यक आहे, परंतु देशाची सार्वभौमता, एकता अबाधित राहील यादृष्टीने लेखान असावे, असे सिंह यांनी यावेळी सांगितले. मुंबई प्रेस क्लबचे सचिव धर्मेंद्र जोरे यांनी प्रास्तविक केले. मुंबई प्रेस क्लबचे गुरुबिर सिंग यांनी सुत्रसंचालन केले.

Post Bottom Ad