अमरावती - देशासमोरील दहशतवाद, काळा पैसा, बनावट नोटा या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धनदांडग्यांचा काळा पैसा कायमचा काळा झाला असून आता हा पैसा पांढरा करता येत नाही हे विरोध करणाऱ्यांचे खरे दुःख आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अमरावती जिल्ह्यात वरूड येथे केली.
वरूड नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती युवराज आंडे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार अनिल बोंडे व भाजपा अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी उपस्थित होते.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने घेतलेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंदीच्या निर्णयामुळे थोडा त्रास होत आहे. आगामी पन्नास दिवस कष्टाचे असले तरी या निर्णयामुळे पुढची पन्नास वर्षे समृद्धीचे असतील. या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक तीर तीन निशान’ साधले आहेत. एकाच निर्णयामुळे दहशतवाद व नक्षलवाद नेस्तनाबूत झाला, बनावट नोटांची समस्या संपली व धनदांडग्यांचा काळा पैसा कायमचा काळा झाला. या निर्णयामुळे आतापर्यंत साडेपाच लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले असून त्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागेल.
त्यांनी सांगितले की, शहरांमधील कचरा व सांडपाण्यामुळे जलस्त्रोतांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. जमिनीचा पोत राखण्यासाठी जलस्त्रोत चांगले ठेवावे लागतील. आपल्या राज्य सरकारने कचरा विलगीकरण व घनकचरा व्यवस्थापन यावर भर दिला आहे. कचऱ्यापासून मोठ्या प्रमाणात खतनिर्मिती करण्यात येत आहे. या खताला शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. सांडपाणी प्रक्रियेच्या बाबतीत नागपूर, सोलापूर व औरंगाबाद महापालिका तसेच बीड नगरपालिका चांगले प्रयोग करत आहेत.
ते म्हणाले की, राज्य सरकारने सर्वसमावेशक विकासावर भर दिला आहे. स्वच्छता, पाणी, शिक्षण व आरोग्य या सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर भर दिला आहे. शहर आरोग्यदायी करण्यासाठी राज्य सरकार मोठा निधी देत आहे. सर्वांसाठी घरे असा सामान्यजनांचा मोठा विचार होत आहे. जनतेच्या हितासाठी राज्याची तिजोरी उघडी आहे. महिला बचतगट मॉल ही योजना राज्याच्या अर्थसंकल्पात आहे. नागपुरात असा पहिला मॉल साकारतोय, अशी माहिती त्यांनी दिली.