सुधारक ओलवे, गिरीश दीक्षित यांना यगगोपालसिंग चड्डा पुरस्कार प्रदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 September 2016

सुधारक ओलवे, गिरीश दीक्षित यांना यगगोपालसिंग चड्डा पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 22 : छायाचित्र कलेतील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या यगगोपालसिंग चड्डा पुरस्काराने आज पद्मश्री सुधारक ओलवे व गिरीश दीक्षित यांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मंत्रालय वृत्तपत्र छायाचित्रकार संघातर्फे हा पुरस्कार दिला जातो. 
प्रेस क्लब येथे आयोजित समारंभात दीक्षित यांना सन 2015 साठीचा तर ओलवे यांना सन 2016 साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती) (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, छायाचित्रकार संघाचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष मनसुखलाल मेहता, गिरीश देशमुख,सचिव अनिल चड्डा तसेच मंत्रालय वृत्तपत्र छायाचित्रकार संघाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

यावेळी देसाई म्हणाले की, छायाचित्र या कलेमध्ये दीक्षित व ओलवे यांनी केलेल्या कार्याची योग्य दखल मंत्रालय वृत्तपत्र छायाचित्रकार संघाने घेतली ही आनंदाची बाब आहे. छायाचित्रकार हा कठीण परिस्थितीतही घटनेचे वस्तुस्थितीदर्शक चित्रण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळे आजही छायाचित्रांचे महत्त्व टिकून आहे. छायाचित्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक छायाचित्रे वाचकांपर्यंत पोहोचवावीत. दीक्षित यांच्या क्रीडा छायाचित्रांचे माझ्यासहित अनेक चाहते असल्याचे देसाई यांनी सांगितले. ओलवे यांच्या छायाचित्र कलेतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून छायाचित्रकारांनी असे पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करावा, असेही देसाई म्हणाले.

भुजबळ म्हणाले की, छायाचित्रणाच्या क्षेत्रामध्ये काम करीत असताना वृत्तपत्र छायाचित्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वेळप्रसंगी जीवावर उदार होऊन काम करण्याची त्यांची तयारी असते. दंगल, महापूर अशा कठीण परिस्थितीमध्ये ते कार्य करीत असतात. वृत्तपत्र छायाचित्रकार व पत्रकारांसाठी राज्य शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. वृत्तपत्र छायाचित्रकारांनी शासनाच्या या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्रालय वृत्तपत्र छायाचित्रकार संघाचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वृत्त छायाचित्रकार नरेंद्र बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष मनसुखलाल मेहता यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह संघाचे पदाधिकारी, सदस्य व वृत्तपत्र छायाचित्रकार उपस्थित होते.

Post Bottom Ad