पुण्यातील मराठा मोर्चास बहुजन संघटनांचा पाठिंबा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2016

पुण्यातील मराठा मोर्चास बहुजन संघटनांचा पाठिंबा

मुंबई । प्रतिनिधी - राज्यात एकापाठोपाठ एक मराठा समाजाचे लाखालाखांचे विराट मोर्चे निघत असून पुणे जिल्ह्याचा मोर्चा रविवारी काढण्यात येणार आहे. पुण्यातील मराठा क्रांती मूक मोर्चास भारतीय दलित पँथर आणि बहुजन रिपब्लीकन सोशलीस्ट पक्ष यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

मराठा समाजाचे मोर्चे दलित समाजाच्या विरोधात नाहीत, मराठ्यांच्या मागण्यांची राज्य सरकारने सहानुभूतीने दखल घ्यायला हवी, त्यासाठी दलित पँथरने पुण्यातील मोर्चास पूर्ण पाठिंबा व्यक्त केला असल्याचे पँथरचे अध्यक्ष रामचंद्र माने म्हणाले. पँथरचे पूर्वाश्रमीचे संस्थापक, नेते आणि विद्यमान आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड (पुणे) यांनी सुद्धा पुण्यातील मराठा मोर्चाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.

अ‍ॅट्रॉसीटी कायद्याचा दुरुपयोग होतो आहे का, याचा शोध घेण्यासाठी एक समिती नेमावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ईबीसी सवलत मर्यादा सहा लाख करण्यात यावी, ब. मो. पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा आणि मराठा समाजास नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे या मराठा क्रांती मोर्चोकऱ्यांच्या मागण्यांना बहुजन रिपब्लीकन सोशलिस्ट पक्षाचे (बीआरपीएस) अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने यांनी पाठिंबा दिला आहे. मराठा आणि दलित यांच्यात तेढ वाढू नये यासाठी माने यांनी पुण्यात समविचारी पक्षांची बैठक घेतली होती.

मोर्चाचे आंबेडकर करणार स्वागत
मराठा समाजाच्या मोर्चाचा शेवट मुंबईतील मोर्चाने होणार आहे. आॅक्टोबरच्या शेवटी होणाऱ्या मुंबईतील मोर्चाचे स्वागत भाकप, माकप, शेकाप आणि भारिप पक्षांनी करायचे ठरवले आहे. त्यासाठी जाती मुक्त आंदोलन समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचे प्रमुख भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर असून मुंबईतील मोर्चाचे ते स्वागत करणार आहेत.

Post Bottom Ad