मुंबई, दि. ९ : अवयव दानाबाबत समाजात प्रबोधन व्हावे या हेतूने राज्यभर ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ दरम्यान "महा अवयवदान अभियान" राबविण्यात येत आहे. या समाजोपयोगी अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.
अवयवदान जनजागृती करण्यासाठी महाअवयवदान अभियान राबविण्यासंदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. महाजन बोलत होते. बैठकीत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव तथा समितीच्या अध्यक्ष मेधा गाडगीळ, आरोग्य संचालनालयाचे संचालक मोहन जाधव, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. डावर, मुंबईचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत थोरात आदी अधिकारी उपस्थित होते.
महाजन पुढे म्हणाले की, विविध क्षेत्रांत कार्य करणा-या सामाजिक संस्था, विद्यार्थी यांचा या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा यासाठी हे अभियान तालुकानिहाय राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय अवयवदान अभियान समिती, विभागीय समिती, जिल्हा समिती, तालुकानिहाय समिती अशा विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विभागीय स्तरावर शासकीय वैद्यकीय अधिष्ठाता समन्वयाचे काम पाहणार आहेत. अभियानाच्या यशस्वीतेसाठी पालक सचिव आपल्या जिल्ह्यातील संबंधितांची बैठक घेतील. समाजातील प्रत्येक घटकाचा या अभियानात सहभाग करून घ्यावा, हे अभियान यशस्वी करण्यासाठी राज्य शासन सर्व क्षमतेने सहकार्य करेल, असेही ते म्हणाले.
या अभियानात १५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. इच्छुकांना अवयव दान करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे. ३० ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी कार्यशाळा, चर्चासत्र, चित्रकला, निबंध स्पर्धा तसेच १ सप्टेंबर रोजी अवयवदान अभियान नोंदणी शिबीराचे उद्घाटन कार्यक्रम व अवयवदान नोंदणी केलेल्या अवयवदात्यांचे सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी बैठकीत दिली.
No comments:
Post a Comment