मुंब्रा, प्रतिनिधी दिनांक 2:- मुंब्रा कौसा येथे मुस्लिम कब्रस्तानसाठी जागा मिळण्याच्या मागणीसाठी व ठाणे महापालिकेच्या कारवाईत तोडण्यात आलेल्या दुकानदारांचे पुनर्वसन लवकर करण्याच्या मागणीसाठी जमैतुल उलेमा ए हिंद या संघटनेने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात भेट घेतली व कार्यवाही करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
मुंब्रा-कौसा या मुस्लिमबहुल विभागात सुमारे दहा ते बारा लाख लोकसंख्या आहे. त्यामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठी आहे. मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी मुस्लिम समाजासाठी सध्या दर्गाह जवळ व कौसा येथे अशी केवळ दोन कब्रस्ताने आहेत. मुंब्रा कौसा परिसरातील लोकसंख्येच्या तुलनेत ही कब्रस्तानची जागा कमी पडत असल्याने मृतदेहाचे दफन करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात जमैतुल उलेमा ए हिंदचे ठाणे जिल्हाध्यक्ष मुफ्ती हुजैफा कासमी, मुंब्रा-कौसाचे अध्यक्ष हाफिज मोहम्मद अयुब खान, कारी वसीम रझा, कारी मोहम्मद अश्रफ, कारी अब्दुल रझ्झाक शेख, फरहान खान , अन्वारुल खान, अझीम शेख व खलील गिरकर यांचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात व्यक्तिशः लक्ष घालून मुंब्रा परिसरासाठी कब्रस्तानची जागा त्वरित मिळण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश ठाणे महापालिका व संबंधितांना द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली.
मुंब्रा येथे लोकसंख्येच्या तुलनेत कब्रस्तानची जागा अतिशय तुटपुंजी असल्याने एखाद्याचा मृत्यु झाल्यास त्या व्यक्तीला दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याने तीन ते सहा महिन्यांपूर्वी खणलेल्या कबरीमध्ये पुन्हा दफन विधी करावा लागत आहे. तीन महिन्यामध्ये मृतदेहाचे विघटन पूर्णतः होत नसल्याने कबर खणल्यावर त्यामध्ये मृतदेहाचे अवशेष, मृतदेहाची कवटी, मिळण्याचे प्रमाण मोठे आहे.
मुंब्रा येथील मित्तल मैदानावर पाच एकर जमीन सर्वधर्मियांच्या कब्रस्तान, स्मशानासाठी मंजूर करण्यात आली आहे, मात्र अनेक तांत्रिक बाबींमध्ये ही जागा अडकली असल्याने अद्याप पर्यंत ही जागा कब्रस्तानसाठी वापरण्यास प्रारंभ झालेला नाही. रशीद कम्पाऊंड परिसरात कब्रस्तानसाठी जागा मंजूर झाली आहे मात्र अद्याप त्याचा वापर सुरु झालेला नाही, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
No comments:
Post a Comment