मुंबई / प्रतिनिधी 11 Aug 2016 -
मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या दुरुस्तीकरणाचे काम येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरु करण्याच्या सूचना एन विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष हारून खान यांनी पालिका अधिकारी, दक्षता समिती व रुग्णालय प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत दिल्या.
दक्षता समितीच्या विविध मागण्यांबाबत एन विभाग कार्यालयात गेल्या २० वर्षात पहिल्यांदाच बैठकी संपन्न झाली. राजावाडी रुग्णालयातील अनेक प्रलंबित मागण्यांचे निवेदन दक्षता समितीने प्रभाग समिती अध्यक्ष हारून खान यांना दिले होते. या अनुषंगाने हारून खान यांनी पालिका अधिकारी रुग्णालय प्रशासन आणि दक्षता समितीची संयुक्त बैठक पालिकेच्या एन विभाग कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीला राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका विद्या ठाकुर, प्रशासकीय अधिकारी शकंर चिखले, दक्षता समिती सदस्य राजेंद्र पिसे, प्रकाश वाणी, मोहम्मद मुकीम शेख, यास्मीन शेख, सरिता ठाकरे, अनिता कोलसकर, नरेंद्र दाभोलकर, चंदु चव्हाण, ज्ञानेश नेरुरकर, संजय दरेकर, अशोक बैरागी तसेच एन विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सादर बैठकीत दक्षता समितीच्या सदस्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना होणाऱ्या त्रासाची माहिती हारून खान यांना दिली. रुग्णालयातील अपघात विभाग ४० नंबर वॉर्ड पासून एक्सरे विभागापर्यंत जाण्याचा रस्ता खराब आहे, अपघात विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबून राहते, सीसीयू विभागाकडे जाणाऱ्या दरवाज्याकडे ड्रेनेज लाईन तुंबून सतत सांडपाणी रस्त्यावर व रुग्णालय परिसरात वाहत असते. दुर्गंधी व सांड पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तसेच रुग्णालयाच्या इमारतीचे दुरुस्तीकरण त्वरित सुरु करावे अशी मागणी करण्यात आली.
यावर एन विभाग प्रभाग समिती अध्यक्ष हारून खान यांनी तातडीने ४० नंबर विभागाच्या परिसरात सुशोभीकरण करून झाडांच्या कुंड्या लावण्याचे, सुरक्षा रक्षकांची चौकी नव्याने बनवण्याचे, एक्सरे विभागाकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्याचे, तसेच रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी लागणार दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ऑक्टोबर पासून दुरुस्तीचे काम करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. रुग्णालयातील असुविधा आणि रुग्नांना होणारा त्रास याबाबत स्वतः हारून खान १६ ऑगस्टला रुग्णालयाला भेट देणार आहेत.
No comments:
Post a Comment