भारताच्या ६९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते पालिका मुख्यालयात आज (दि. १५ ऑगस्ट २०१६) सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ६९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी समस्त मुंबईवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी महापालिका आयुक्त अजोय मेहता, नगरसेवक अवकाश जाधव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख व उपायुक्त, खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्त, इतर अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी ९ मे २०१५ रोजी गोकुळ निवास, काळबादेवी येथील इमारतीस लागलेल्या भीषण आगीपासून तेथील रहीवाश्यांच्या जिविताचे व वित्ताचे संरक्षण करताना स्वप्राणांचे बलिदान करत हौतात्म्य पत्करलेले मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख (दिवंगत) सुनील नेसरीकर, उप प्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर अमिन, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे, केंद्र अधिकारी महेंद्र देसाई या महापालिकेच्या चारही अधिकाऱयांना महाराष्ट्र राज्यातून माननीय राष्ट्रपतींचे ‘अग्निशमन सेवेतील राष्ट्रपती शौर्यपदक’ (मरणोत्तर) सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहिर केले आहे. या चारही अधिकाऱयांच्या कुटुंबियांना तसेच अग्निशमन सेवेतील राष्ट्रपती शौर्यपदक प्राप्त सहाय्यक केंद्र अधिकारी अमोल मुळीक, अग्निशामक भूषण निंबाळकर या राष्ट्रपती शौर्यपदक पुरस्कार प्राप्त अधिकारी व जवानांनाही मुंबईचे महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच महापालिका चिटणीस खात्यातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱया ‘ वार्षिक प्रकाशन’ चे महापौरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सुरक्षा दल व अग्निशमन दलातर्फे महापौरांना मानवंदना देण्यात आली. यानंतर ‘बाबासाहेब वरळीकर’ यांच्या ४४ व्या स्मृतीदिनानिमीत्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
No comments:
Post a Comment