मुंबई, दि. 16 : राज्यातील सुमारे 179 कायदे कालबाह्य झाले असून त्यात बदल करण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाने त्यातील 79 कायदे रद्द केले असून कालसुसंगत, असे सोपे आणि सुविहित 100 नवीन कायदे तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या (फिक्की) राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन निवोटीया, सचिव दिदार सिंग, वरिष्ठ उपाध्यक्ष पंकज पटेल व माजी अध्यक्ष ज्योत्स्ना सुरी आदी उपस्थित होते.
मुंबईतील कोस्टल रोड, एलिव्हेटेड रेल्वे व महामार्ग, नवी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, मेट्रो व मोनो रेल्वेची कामे यामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा दर्जा उंचावणार असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
नागपूर मुंबई संचार शीघ्रगती संपर्क महामार्गामुळे राज्याच्या विकासात नवे मापदंड निर्माण होणार आहेत. या महामार्गामुळे राज्यातील 22 जिल्ह्यांच्या विकासात आमूलाग्र बदल होणार आहे.या मार्गातील जिल्हे थेट जवाहरलाल नेहरू पोर्टशी जोडले जाणार असल्यामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे. या महामार्गामुळे व्यवसाय व उद्योग क्षेत्राचे संपूर्ण चित्रच बदलणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या निर्माणात मोठ मोठ्या कंपन्यांनी उत्सुकता दाखविली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
शासनाने गुंतवणूकस्नेही धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचे महाराष्ट्र हे पसंतीचे राज्य झाले आहे. उद्योगांना सोयीसुविधा देण्यासाठी परवान्यांची संख्या कमी केली आहे.राज्याच्या विधी आयोगाने अनेक कालबाह्य कायदे रद्द करण्यास सांगितले असून त्यावर राज्य शासन काम करीत आहे. जमिनीसंदर्भातील कायद्यांमध्ये राज्य शासनाने महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. कमीत कमी कायदे असावेत, यासाठी आग्रही असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.
हरित महाराष्ट्राच्या दिशेने राज्य शासनाने पावले उचचली आहेत. एकाच दिवशी राज्यात सुमारे अडीच कोटी झाडे लावण्यात आली आहेत. येत्या पाच वर्षात पन्नास कोटी झाले लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशाच्या विकासात फिक्कीचे योगदान महत्त्वाचे आहे. राज्याच्या अनेक धोरण निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये फिक्कीने मोलाचे सहकार्य केल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
फिक्कीचे अध्यक्ष निवोटिया यांनी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र शासनाने केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, राज्याने राबविलेल्या धोरणांमुळे अनेक उद्योग येथे येण्यास उत्सुक आहेत. अनेक मोठ्या उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
No comments:
Post a Comment