मुंबई दि.१३: लोकराज्य, महाराष्ट्र अहेड, उर्दू लोकराज्य या वाचकप्रिय शासकीय नियतकालिकांची निर्मिती करणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी अभिव्यक्तीचे नवे दालन 'आपलं मंत्रालय' या गृहपत्रिके मार्फत उघडले आहे. या नियतकालिकाचे प्रकाशन १५ ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १२.३० ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह हे या गृहपत्रिकेचे मुख्य संपादक आहेत.
महाराष्ट्राच्या ध्येय धोरणाला आकार देणाऱ्या मंत्रालयातील सुमारे ७ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या व्यस्ततेतही व्यक्त होण्यासाठी या नियतकालिकाचा उपयोग होणार आहे. मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आशा-आकांशा-अपेक्षांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे. मंत्रालयातील प्रमुख घडामोडी, कर्मचाऱ्याबद्दलचे महत्वाचे निर्णय यासोबतच मंत्रालयातील लेखक, कवी, कलावंत, खेळाडू यांनाही अभिव्यक्त होण्यासाठी यामाध्यमातून संधी मिळणार आहे. याशिवाय पदोन्नतीची माहिती, निवृत्तीची खबर, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या उपलब्धीलाही यामध्ये प्रसिध्दी दिली जाणार आहे. ४० पृष्ठसंख्या असणारे हे नियतकालिक मोफत वितरणाचे असून कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद व समन्वय राखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
No comments:
Post a Comment