महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा पाच कोटी नागरिकांना लाभ देणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2016

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा पाच कोटी नागरिकांना लाभ देणार - मुख्यमंत्री

पुणे. दि. 18 Aug 2016 राज्यातील गोरगरीब जनतेला कॅशलेस उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु करणार असून त्यामध्ये पाच कोटी नागरिकांना लाभ देण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. रुग्णालयांमधील गरीब रुग्णांसाठीच्या राखीव खाटांची माहिती ऑनलाईनरित्या सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यामुळे गरीबांना वेळेत उपचार उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.


दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील नवीन एमआरआय विभागाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
            
राज्यातील सर्वसामान्यांसाठी एक चांगली आरोग्य योजना असावी या दृष्टीने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु करण्यात येणार आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, या योजनेत 1200 आजारांवर 500 पेक्षा अधिक नामांकित रुग्णालयांत कॅशलेस उपचार होणार आहेत. त्यासाठीचे वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टकार्ड सर्व लाभार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दीड कोटी नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. ही वैद्यकीय विमा प्रकारची योजना असणार आहे. मराठवाडा व विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्याची कारणे पाहता एकीकडे नापिकी व दुसरीकडे आरोग्याचा प्रश्न ज्यामध्ये उपचारांसाठी पैसे नाही अशीही कारणे आत्महत्यांमागे असल्याचे आढळून आले. यामुळे या सर्व आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडील एकूण खाटांपैकी दहा टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे.  यापूर्वी 70 ते 80 कोटी खर्च रुग्णालये करीत होती. गेल्या वर्षभरात सरकारने विविध प्रकारे पाठपुरावा करुन या रुग्णालयांना जबाबदारीची जाणीव करुन दिली. त्यामुळे हेच प्रमाण आता 200 कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना यापूर्वी वैद्यकीय मदत देण्यात येत होती. ती यापूर्वी पूर्वी पाच ते दहा हजारांपर्यंत केली जायची त्यामध्ये तीन लाखांपर्यंत भरीव वाढ करण्यात आली आहे. आता याच बरोबरीने नवीन मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करुन गरजू रुग्णांना नामांकित रुग्णालयांतून कमीत कमी खर्चात, सवलतीच्या दरात उपचार मिळावेत यासाठी पर्यवेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ हजार 800 रुग्णांना या कक्षाकडून मदत देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad