मुंबई, दि. 3 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाड, जि. रायगड येथील स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करणार, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत दिली. सदस्य सुनिल तटकरे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती त्यास उत्तर देताना बडोले बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले असून महाड येथे राष्ट्रीय स्मारकासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुरुवातील या स्मारकाची देखभाल दुरुस्ती आयुक्त कार्यालयाकडे होती. 2008 पासून बार्टी या संस्थेकडे देण्यात आली आहे. याठिकाणी 1 हजार प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह बांधण्यात आले आहे. तर येथील ग्रंथालयात 9613 ग्रंथ उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या स्मारकाच्या देखभालीसाठी स्थानिक 18 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्मारकाचे सुशोभीकरण करणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यानुसार कामकाज केले जात आहे. तसेच येथील तरंग तलाब बंद असून तो लवकरच सुरु करण्यात येईल असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या चर्चेत सदस्य हेमंत टकले, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment