दलित प्रश्नी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2016

दलित प्रश्नी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली : दलितांवरील हल्ल्यांचा कठोर शब्दांत निषेध करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता विरोधकांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. 'पंतप्रधानांनी या मुद्यावर केवळ मगरीचे अश्रू न ढाळता हल्लेखोरांवर ठोस कारवाई करण्याचे धाडस दाखवावे', अशी मागणी या प्रकरणी विरोधकांनी विशेषत: काँग्रेस, सप व बसपने केली आहे. काँग्रेसने सोमवारी या मुद्यावरून लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कारही टाकला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत शनिवारी दलितांवरील हल्ल्यांचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटनांना गोरक्षेच्या नावाखाली सुरू असलेली दुकानदारी बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या विधानाचे सोमवारी लोकसभेत पडसाद उमटले. 'पंतप्रधानांनी या प्रकरणी मगरीचे अश्रू ढाळू नये, भाषण करण्याऐवजी ठोस कारवाई करावी; तथापि, या प्रकरणी संसदेत निवेदन करून आपली भूमिका स्पष्ट करावी', अशी मागणी काँग्रेसने या प्रकरणी केली. शून्य प्रहरास सुरुवात झाल्यानंतर लागलीच काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभापती सुमित्रा महाजन यांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यावर काँग्रेस खासदारांनी सभापतींपुढील हौद्यात धाव घेऊन सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केली. तद्नंतरही सभापतींनी त्यांची मागणी फेटाळून लावल्याने अखेर काँग्रेसने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आपला निषेध नोंदवला. दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश सिंह यादव यांनी भाजप गोरक्षेच्या नावाखाली समाजात फूट पाडत असल्याचा आरोप करत हा विकासावरील चर्चा अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या उत्तर प्रदेश निवडणुकीतील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार शीला दीक्षित यांनीही या मुद्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला.

कुंभकर्ण उशिरा उठला -मायावती'गोरक्षक मागील २ वर्षांपासून मुस्लिम व दलितांवर अत्याचार करताहेत. हा अन्याय सुरू असताना पंतप्रधान मोदी कुंभकर्णासारखे गाढ झोपेत होते. आता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे ते झोपेतून उठले आहेत', असे मायावती यांनी म्हटले आहे.

हिंदुत्ववादी संघटनांचा जळफळाट
पंतप्रधानांनी दलित मारहाणीच्या मुद्यावर हिंदुत्ववादी संघटनांना धारेवर धरल्यानंतर गोरक्षक व संत समाज चांगलाच नाराज झाला आहे. 'पंतप्रधानांनी कोणत्या आधारावर ८0 टक्के गोरक्षकांना गुंड ठरवले?' असा सवाल उपस्थित करत हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी या प्रकरणी मोदींना नोटीस पाठविण्याची घोषणा केली आहे. विहिंप'नेही मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत त्यांचे विधान गोरक्षकांसाठी धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. लक्षावधी गायींची हत्या करणारे कसाई गुंड नाहीत? तुमच्यातील हे परिवर्तन अनाकलनीय आहे. ८0 टक्के गोरक्षक बोगस आहेत, तर तुम्ही तुमच्या १0 वर्षांच्या कारकीर्दीत किती लोकांना शासन केले? असे विविध प्रश्न 'विहिंप'ने आपल्या निवेदनात उपस्थित केले आहेत.?

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad