मुंबई, दि. 18 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशातून पहिल्या आलेल्या टीना डाबी यांचा ‘बार्टी’च्या (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) वतीने उद्या, दि. 19 ऑगस्ट 2016 रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘बार्टी’चे महासंचालक राजेश ढाबरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी 11.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, विभागाचे सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे,समाजकल्याण विभागाचे आयुक्त पीयूष सिंह, मुंबई विभागाचे मुख्य आयकर आयुक्त सुबचन राम, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, दिल्लीतील पोलीस अधिकारी संदीप तामगाडगे,सनदी अधिकारी सुनिल वारे, सचिन शिंदे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे विजय वाघमारे, सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त सतीश ढवळे, आयकर विभागाच्या उपायुक्त क्रांती खोब्रागडे, विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोटसुर्वे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
डाबी या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवेत देशभरात प्रथम येणाऱ्या अनुसुचित जातीतील पहिल्या विद्यार्थिनी आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डाबी या मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षार्थींसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार असल्याचेही ढाबरे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment