मुंबई 10 Aug 2016 - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'बी' विभागातील मस्जिद बंदर परिसरात असणा-या केशवजी नाईक मार्गावरील इमारत क्रमांक ११ ही अनधिकृत इमारत तोडण्याची कारवाई सुरु झाली आहे. तसेच या इमारतीचा पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा देखील यापूर्वीच खंडीत करण्यात आला आहे. या इमारतीचे तोडकाम करण्याची कार्यवाही सुरळीतपणे व्हावी यासाठी मुंबई पोलीस दलाचे व वाहतूक पोलीसांचे मोलाचे सहकार्य महापालिकेला लाभले आहे, अशी माहिती 'बी' विभागाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी दिली आहे.
'बी' विभागात रेल्वे हद्दीजवळ असणारी सदर अनधिकृत इमारत ही तळमजला + ११ मजल्यांची आहे. या इमारतीचा विद्युत पुरवठा यापूर्वीच खंडीत करण्यता आला होता.मात्र, त्यानंतर सदर इमारतीमध्ये जनित्राचा (जनरेटर) वापर होत असल्याचे आढळून आल्याने सदर जनित्र व इमारतीमधील उद्वाहन देखील कारवाई दरम्यान उध्वस्त करण्यात आले आहे. तसेच इमारतीमधील सदनिकांच्या अंतर्गत भिंती, किचनचा ओटा व बाथरुमच्या भिंती तोडण्यात येऊन सदर इमारत राहण्यास अयोग्य करण्यात आली आहे.सदर अनधिकृत इमारत जमीनदोस्त होईस्तोवर संबंधित कारवाई सुरु राहणार आहे, अशी माहिती शिरुरकर यांनी दिली आहे.
महापालिकेच्या 'बी' विभागातील ८० जणांच्या चमूने ही धडक कारवाई केली आहे. या कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीसांच्या ८० जणांच्या चमूचे आणि परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यासाठी वाहतूक पोलीसांचेही मोलाचे सहकार्य महापालिकेला लाभल्याने ही कार्यवाही करणे सुकर झाले आहे, अशीही माहिती शिरुरकर यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment