मुंबई / प्रतिनिधी -
राज्यात 22 वर्षांपासून सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सशक्तीकरणासाठी प्रभावी योजना तयार केली नाही. केवळ निधीच्या उपलब्धतेनुसार वार्षिक योजना तयार केल्या आहेत. मार्च 2015 अखेरपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक योजना आणि इतर कार्यासाठीचा निधीही या विभागाकडे अखर्चित राहिला होता. 2011 ते 2015मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेशवाटप केले असले, तरी विद्यार्थ्यांची संख्या मात्र स्पष्ट करण्यात आली नाही. या विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या प्रमाणात अन्न-धान्यही पुरवण्यात येत नव्हते.
नवीन सरकारी आश्रमशाळा आणि वसतिगृहे बांधण्यासाठी विलंब करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी-सुविधा कमी असताना सौर पाणी तापके आणि बायोमॅट्रिक हजेरीच्या प्रणालीसाठी 29 कोटी 81 लाख रुपये खर्च करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शिष्यवृत्तीचा निधी राखून ठेवला असतानाही या विभागाने शिष्यवृत्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. आश्रमशाळांमधील मूलभूत सोयी-सुविधा व बांधकामांवर चुकीचा खर्च करण्यात आला आहे. तसेच एकाच आश्रमशाळेत वेगवेगळ्या दराने कॅटरिंगला कंत्राट आणि विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात प्रसाधनगृहे आणि स्नानगृहांची कमतरता असल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.
No comments:
Post a Comment