मुंबईतील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार
मुंबई / प्रतिनिधी – मुंबई गोवा महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाड येथील दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकाही जागी झाली आहे. वर्ष भरापासून रखडलेली ऑडिटची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्वच पुलांचे सर्वेक्षण करून स्ट्रक्चरल ऑडिट तयार करण्यात येणार आहे. पुलांच्या बांधणीपासून ते अतिधोकादायक पुलांच्या पाडकामापर्यंत सर्वच बाबींचे सर्वेक्षण करून सर्वसमावेशक असे स्ट्रक्चरल ऑडिट तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार असून कंत्राट देण्याबाबतची निविदा प्रक्रिया वर्षभरापूर्वी सुरू झाली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव येत्या १५ दिवसांत स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेने डिसेंबर २०१५ रोजीच म्हणजेच एक वर्षापूर्वीच मुंबईतील ३१४ पुलांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठीच्या निविदा प्रक्रियेला मार्च २०१५ मध्ये सुरुवात झाली. मुंबईतील शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरांसाठी तीन स्वतंत्र सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पुलांची संपूर्ण तपासणी करून त्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल. सर्वच पुलांचा आढावा घेण्यात येणार असून यासाठी एकूण तीन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पुलाची लांबी-रुंदी किती, हा पूल कधी तयार केला, त्याची क्षमता किती आहे, या पुलावरून किती वजनाच्या क्षमतेची वाहने जाऊ शकतात, सध्या त्याची काय अवस्था आहे इत्यादीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. ही कामे सल्लागारच करतील अशी माहिती पूल अभियंता शितला प्रसाद कोरी यांनी दिली. तसेच रेल्वे हद्दीतील पुलांचीही तपासणी करण्यात येणार आहे. मुंबईत करी रोड, दादर टिळक ब्रिज, एलफिन्स्टन, ग्रॅण्ट रोड आणि परळ हे ब्रिटिशकालीन पूल आहेत.
No comments:
Post a Comment