मुंबई, दि. 4 : अलिबाग येथील रुग्ण तात्काळ मुंबई येथील रुग्णालयात हलवायचे झाल्यास रुग्णांसाठी ‘बोट ॲम्ब्युलन्स’ सुविधा पावसाळा संपल्यानंतर सुरु करण्यात येईल असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या रिक्त पदाबाबतचा प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य समीर कुणावार, यशोमती ठाकूर यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता.
डॉ.सावंत म्हणाले की, अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही पदे रिक्त आहेत. दरम्यान या रुग्णालयातील वर्ग 1 च्या मंजूर 19 पदांपैकी 7 पदे भरलेली आहेत. तसेच वर्ग 2 मधील मंजूर 31 पदांपैकी 24 पदे भरलेली आहेत. याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या विशेषज्ञांमार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना आवश्यक आरोग्यसेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येतात. तथापि, अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक सुविधा रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्यास त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील शासकीय रुग्णालयात संदर्भीत केले जाते. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवेतील गट अ मधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.
No comments:
Post a Comment