मुंबई / प्रतिनिधी- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत विविध प्राथमिक आरोग्य सुविधा आरोग्य केंद्रांमार्फत दिल्या जातात. सदर सुविधा देताना संबंधित आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱयांकडे त्यांच्या विभागातील लोकसंख्या, गरोदर माता, ५ वर्षांखालील बालके, जननक्षम जोडपी यांची माहिती आपण द्यावयाची आहे व याकरीता संबंधित आरोग्य केंद्राचे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षणाची माहिती गोळा करुन नोंदवहीमध्ये त्याची नोंदणी करीत आहेत.
यामध्ये आरोग्य केंद्र कर्मचाऱयामार्फत (सहाय्यक परिचारीका प्रसविका, समन्वयक, आरोग्य स्वयंसेविका) जननक्षम जोडप्यांना कुटुंब नियोजन पद्धती (तात्पुरत्या व कायम) बाबत माहिती / उपाय,जसे निरोध, गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप करणे व तांबी, स्त्री नसबंदी व पुरुष नसबंदी इत्यादीसाठी प्रोत्साहीत करणे, तसेच विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांची माहिती देण्यात येते.
सध्या राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदर माहितीच्या नोंदी, प्रजनन व बाल आरोग्य नोंदवहीमध्ये घेत असून ही माहिती केंद्र शासनाच्या Reproductive and Child Health (RCH) (प्रजनन व बाल आरोग्य) वेब पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरु आहे. त्यामध्ये केंद्र शासन व राज्यशासनामार्फत राबविल्या जाणाऱया विविध योजनांतर्गत आरोग्य सेवा-सुविधांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड, मोबाईल नंबर व शक्य असल्यास लाभार्थीचे किंवा तिच्या नवऱयाचे बँक खाते क्रमांक दिल्यास सदर योजनेतील लाभ आपल्या बँकेतील खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. तसेच भविष्यात येणाऱया शासनाच्या विविध योजनांचे लाभदेखील आपला आधारकार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांकाशी संलग्नित होणार आहेत. विविध आरोग्यविषयी संदेश जसे गर्भवतीमाता व नवजात बालकांची काळजी, लसीकरणाबाबत माहिती इत्यादींबाबत लाभार्थींच्या मोबाइलवर देण्यात येणार आहे.
राज्यशासनाच्या मार्गदर्शकसूचनेनुसार, Reproductive and Child Health (RCH) (प्रजनन व बाल आरोग्य) पोर्टलवर जननक्षम जोडपी यांची १०० टक्के माहिती भरण्याकरीता ३ आठवडय़ांची विशेष मोहिम दिनांक १६.०८.२०१६ ते ०५.०९.२०१६ या कालावधीमध्ये राबविण्यात येत असून जनतेला अशी विनंती करण्यात येत आहे की, जेव्हा आरोग्य केंद्रातील कर्मचारी आपल्या घरास भेटी देतील, त्यावेळी विचारलेली उपरोक्त माहिती त्यांना देण्यात यावी व सदर उपक्रम राबविण्यास सहकार्य करावे, असे पालिकेने आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment