मुंबई, दि. 4 : मोटार वाहन कायद्यांतर्गत आकारण्यात येणाऱ्या तडजोड शुल्काची (दंडाची) रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
परिवहन मंत्री रावते यांनी नियम 47 अन्वये निवेदन केले. ते म्हणाले की, 1988 च्या कलम 200 खाली राज्य शासनास असलेल्या अधिकारान्वये वाहन चालकांनी केलेल्या गुन्ह्याबाबत तडजोड शुल्क (दंडाची) रक्कम आकारण्यात येते. मोटार वाहन कायद्यांतर्गत आकारण्यात येणाऱ्या तडजोड शुल्काची (दंडाची) रक्कम अत्यंत किरकोळ असल्यामुळे वाहन चालकांमध्ये वाहन चालविण्याबाबत बेशिस्तीचे प्रमाण वाढले आहे. सदर बेशिस्तीवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक गुन्ह्यामधील तडजोड शुल्कामध्ये (दंडामध्ये) वाढ करणे आवश्यक झालेले आहे.
त्यामुळे हेल्मेट न घालणे, विनाअनुज्ञप्ती वाहन चालविणे, शारिरीक / मानसिक दृष्ट्या अपात्र असताना वाहन चालविणे, अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लंघन करणे यापैकी होणाऱ्या वाहतूक गुन्ह्यांसाठी रु. 500/- एवढे तडजोड शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच वाहनांची नंबर पाटी विहित पध्दतीने न लिहिणे म्हणजे दादा, मामा, बाबा इत्यादी प्रकारे लिहिणे, वाहनांस रिफ्लेक्टर्स नसणे किंवा टेल लाईट नसणे, अनधिकृत व्यक्तीस वाहन चालविण्यात येणे, अति वेगाने वाहन चालविणे, धोकादायकपणे वाहन चालविणे, वाहनात अवैध बदल करणे, विना नोंदणी दुचाकी वाहन चालविणे यापैकी होणाऱ्या वाहतूक गुन्ह्यांसाठी रु. 1000/- एवढे तडजोड शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे वाहनांची शर्यत लावून वाहन चालविणे, विना नोंदणी चार चाकी वाहन चालविणे, विमा नसताना वाहन चालविण्यास देणे या वाहतूक गुन्ह्यांसाठी रु. 2000/- एवढे तडजोड शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment