मुंबई- दि.१ ऑगस्ट 2016
अखंड महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो कदापी सहन केला जाणार नाही. सरकारने स्वतंत्र विदर्भाबाबत तात्काळ आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा सरकारला कोंडीत पकडले.
आज विधान परिषदेत पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा गाजला, यावेळी धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये या मुदद्यावर चर्चेची मागणी करुन सरकारने अखंड महाराष्ट्राच्या बाबतची नेमकी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबतच काँग्रेस, शिवसेनेच्या आमदारांनी पाठिंबा देत ही मागणी लावून धरली, यावर दोन्ही बाजूनी गदारोळ होऊन सभापतींनी विधान परिषदेचे काम पहिल्यांदा पंधरा मिनिटे व नंतर दिवसभरासाठी तहकूब केले.
त्यानंतर बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या एका खासदारांनी लोकसभेत अशासकीय ठराव आणून वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती, सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्य सरकार मधील एक ज्येष्ठ मंत्री व आमदार वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार करत आहेत. केंद्रात व राज्यात सध्या एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे सरकारची वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत काय भूमिका आहे, ती राज्यातील जनतेला समजली पाहिजे, यासाठी आम्ही आज २८९ अन्वये चर्चेची मागणी केली. परंतु सरकारने यासंबधी कोणतीही भूमिका स्पष्ट करण्याचे टाळले .
भारतीय जनता पार्टी अखंड महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही. तोपर्यंत आपण यावर आक्रमक राहू असे ते म्हणाले. ज्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी अखंड महाराष्ट्रासाठी साहित्यातून चळवळ उभी केली त्यांच्या जयंती दिनीच महाराष्ट्र तोडण्याची भूमिका घेतली जात असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
No comments:
Post a Comment