सर्वांचे सहकार्य घेऊन महिनाभरात घेणार बैठक- राजकुमार बडोले
मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) ः शेकडो आंबेडकरी विचारवंत, विद्रोही कवी, साहित्यिक, नेते, लेखक पत्रकार घडविणाऱ्या मुंबईतील सिध्दार्थ विहार होस्टेल या पाडण्यात आलेल्या ऐतिहासिक वास्तूची पुन्हा उभारणी करण्याचे सुतोवाच सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधान परिषदेत केले. यासाठी संबधित विश्वस्त आणि सभागृहातील सदस्यांची संयुक्त बैठक महिनाभरात घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक, राजकिय, समाजिक, सांस्कृतिक चळवळीचे ऐतिहासिक केंद्र राहिलेल्या वडाळा मुंबई येथील सिध्दार्थ विहार या होस्टेलची पुन्हा नव्याने उभारणी करून ग्रामिण विद्यार्थ्यांना मुंबईत उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, या बाबीकडे ॲड. जयदेव गायकवाड यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना बडोले बोलत होते.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून राज्यभर विविध शैक्षणिक संस्थांची उभारणी करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण आणि निवासाच्या व्यवस्था निर्माण केल्या. याच श्रृंखलेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या बांधकाम आराखड्यानुसार वडाळा येथे सिध्दार्थ विहार होस्टेल १९६० मध्ये उभाण्यात आले. या इमारतीत एकूण १४५ खोल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते उपजले. नामदेव ढसाळांसारखे विद्रोही कवी, विचारवंत रामदास आठवले यांनी आंबेडकरी चळवळ येथूनच सुरू केल्याचे बडोले यांनी सांगितले.
मात्र सदर वास्तू जीर्ण होऊन मोडकळीस आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेन ९ फेब्रुवारी २०१५ मध्ये सदर वास्तू जमीनदोस्त केली. मात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी या विहाराच्या उभारणीसाठी पिपल्स एज्युकेशनल ट्रस्ट तसेच सभागृहातील सदस्यांची संयुक्त बैठक एका महिन्यात घेऊन लवकरात लवकर या इमारतीचे बांधकाम शासनाच्या वतीने सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे बडोले यांनी स्पष्ट केले.
यावेळी झालेल्या चर्चेत भाई जगताप, यांनी भाग घेऊन सिध्दार्थ विहार होस्टेल येथूनच पँथर चळवळ सुरू झाल्याचे तसेच ते आपले वैभव असल्याचे नमुद केले तर प्रविण दरेकर यांनी आपणही सिध्दार्थ महाविद्यालयात शिक्षण घेतल्याचे अभिमानाने सांगितले.
No comments:
Post a Comment