मुंबई, दि. 8 : नरेगा अंतर्गत दिनांक 9 ऑगस्टपासून 11 ऑगस्टपर्यंत नवीन जॉब कार्ड नोंदणी व नूतनीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती रोहयो विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नरेगा योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे, शारिरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम, 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी आणि या प्रवर्गामधील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, कृषि कर्जमाफी व कर्ज सहाय्य योजना, 2008 यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांतभूधारक शेतकरी या प्रवर्गांना अनुज्ञेय आहेत.
पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना देण्यावर भर देण्यात येणार आहे. तथापि त्यासाठी जॉब कार्ड आवश्यक आहे. विहीर, शेततळे, फळबाग, शौचालय, घरकुल, व्हर्मी कंपोस्ट, इत्यादी लाभाच्या योजना नरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहेत. अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्याकडे जॉब कार्ड असल्यास नूतनीकरण करणे आवश्यक आहे. जॉब कार्ड नसल्यास नवीन नोंदणी करणे गरजेचे आहे. 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत अशा सर्व योजनांच्या लाभार्थ्यांच्या यादीस मंजुरी घ्यावी व योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment