मुंबई, दि. 4 : जेथे उद्योग सुरु होतील तेथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उभारले जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या जमिनी जबरदस्तीने संपादित केल्या जाणार नाहीत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य प्रभाकर घार्गे यांनी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा व उद्योगांच्या विकासासाठी करावयाच्या उपायांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना देसाई बोलत होते.
देसाई म्हणाले की, या अगोदर बंद पडलेल्या एमआयडीसीतील जागाही मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांसाठीच्या भूसंपादनातून बागायती शेत जमिनी वगळल्या जातील. राजनगाव, चाकण, मावळ येथेही अशा जमीन वगळण्यात आल्या आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या विकासासाठी वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. दलित उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती, जमातींना उद्योग वाढीसाठी विविध प्रकारच्या सवलती देण्यात येत आहे.
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन लवकरच महिला उद्योजक धोरण जाहीर करणार आहे. तसेच राज्यात अमरावतीप्रमाणे यवतमाळमध्ये वस्त्रोद्योग उद्यान स्थापन करणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment