मुंबई, दि. 1 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सामान्य माणसाच्या मनात आणि रक्तात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवले. या महापुरुषाचे व्यक्तिमत्व सर्वांना प्रेरणादायी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
बृहन्मुंबई महानगर पालिका व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या 96 व्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार आशिष शेलार, भाई गिरकर, अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष रवींद्र पवार आदी उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सामान्य माणसांच्या जीवनात क्रांती घडवली. अशा महापुरुषाला अभिवादन करण्याची संधी मला या कार्यक्रमातून मिळाली हे माझे भाग्य मानतो, अशी भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लहुजी साळवे आयोगाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, रोजगार तसेच स्वयंरोजगार आदी अनेक क्षेत्रांत विविध योजना राबविण्यात येत आहेत, घरकुल योजनेअंतर्गत सव्वालाख घरांपैकी 25 हजार घरे मातंग समाजाला देण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे लहुजी साळवे आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
No comments:
Post a Comment