मुंबई, दि. 5 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महत्वाची 11 विधेयके मंजूर करण्यात आली असून जनहिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णयही या अधिवेशनात घेण्यात आले आहेत. त्यामुळे हे अधिवेशन लोकाभिमुख निर्णयाचे आणि अत्यंत सकारात्मक ठरले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अधिवेशनाच्या समाप्तीनंतर विधानभवनातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारच्यावतीने कोपर्डी प्रकरणाची अतिशय गतिमान हाताळणी करण्यात आली. याप्रकरणातील फॉरेंन्सिक पुरावे गोळा करणे, हा खटला चालविण्यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणे यासह अशी प्रकरणे पुन्हा होऊ नयेत यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. महाड येथील पुल दुर्घटना प्रकरणातही शासनाने गतिमान कार्यवाही केली व अधिवेशन कालावधीत या संदर्भात तातडीने निर्णय घेतले. सेना दलासह विविध यंत्रणांचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कालावधी 10 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला. इतर मागासवर्गीयांसाठी नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट बाजारात विक्री करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सावता माळी यांच्या नावाने एक बाजार योजना राज्य शासनामार्फत सुरु करण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा म्हणून येत्या 14 ऑगस्ट रोजी विधानभवनातील पार्किंगच्या जागेवर पहिला बाजार सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईला वाय-फाय सिटी बनविण्याचा मनोदय जाहीर केला आहे. नवीन विद्यापिठाचा कायदा झाल्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका घेता येण्याच्या दृष्टीने घोषणा झाली आहे. जातीच्या दाखल्याची पडताळणी करताना ती रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला तातडीने देण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींसाठी तडजोड शुल्काची रक्कम वाढविण्याचा निर्णय झाला आहे. अवैध उत्खनन रोखण्यासाठी कडक कायदे केले आहेत. याकामी मोबाईल तथा ॲप बेस मॉनिटरिंग करण्याचा प्रयत्न आहे. जनहिताचे असे अनेक निर्णय झाल्याने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आणि सकारात्मक ठरले, असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment