मुंबई, दि. 3 : पुरस्कार मिळणे हे आनंददायी असते. पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या चांगल्या कार्याची दखल घेतली जात असल्यामुळे पुरस्कार आपल्यावरची जबाबदारी वाढवित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आर.आर. पाटील फाऊंडेशन प्रस्तुत आणि लोकमत वृत्तसमूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार 2016’ या सोहळ्याचे यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
लोकमत वृत्तसमूहाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना‘लोकमत रीडर्स चॉईस अवॉर्ड’ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, लोकमत वृत्तसमूहाचे विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, मंत्रिमंडळातील विविध खात्याचे मंत्री तसेच विधान सभा, विधान परिषदेचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आर.आर. पाटील हे उत्तम संसदपटू होते. ते संवेदनशील आणि कर्तृत्वशील वक्ते देखील होते. त्यांच्या नावाने असणाऱ्या या फाऊंडेशनव्दारे देण्यात येणाऱ्या पुरस्काराने नक्कीच सर्व पुरस्कारार्थ्यांच्या जबाबदारीमध्ये वाढ झाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी लोकशाहीच्या सर्व स्तंभांनी एकत्रित काम करणे गरजेचे असल्याने माध्यमांनी देखील सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे, जेणेकरुन लोकशाही अधिक प्रगल्भ होईल.
यावेळी मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभा ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ‘उत्कृष्ट नवोदित आमदार’ पुरस्कार सदस्य राहूल नार्वेकर, अतुल भातखळकर यांना, तर ‘उत्कृष्ट महिला आमदार पुरस्कार’ नीलमताई गोऱ्हे (विधान परिषद) व वर्षा गायकवाड (विधान सभा) यांना त्याचप्रमाणे, उत्कृष्ट अभ्यासू वक्ता आमदार पुरस्कार” विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व प्रकाश अबीटकर यांना देऊन गौरविण्यात आले.
पुरस्काराचे मानकरी -
- लोकमत रिडर्स चॉईस अवॉर्ड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- जीवनगौरव पुरस्कार (विधानसभा सदस्य) - गणपतराव देशमुख
- जीवनगौरव पुरस्कार (विधान परिषद सदस्य) - शिवाजीराव देशमुख
- उत्कृष्ट नवोदित आमदार (विधानसभा सदस्य) - अतुल भातखळकर
- उत्कृष्ट नवोदित आमदार (विधान परिषद सदस्य) - राहुल नार्वेकर
- उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा सदस्य) - वर्षा गायकवाड
- उत्कृष्ट महिला आमदार (विधान परिषद सदस्य) - निलम गो-हे
- उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानसभा सदस्य) - प्रकाश आबिटकर
- उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधान परिषद सदस्य) - धनंजय मुंडे
No comments:
Post a Comment