मुंबई, दि 4 : महाड येथे झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. तातडीने सर्वे करून वेळेत नवीन पुल तयार करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. महाड दुर्घटनेसंदर्भात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य अजित पवार यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला होता. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जल तज्ज्ञ, संरचनात्मक तज्ज्ञांना घटनास्थळी पाठविण्यात आले असून लवकरच ते त्यासंदर्भातील अहवाल सादर करतील.
पूल वाहून गेल्यावर तो पुन्हा वापरायचा की नाही यासाठी प्राथमिक संरचनात्मक तपासणी सुरू करण्यात येईल. तसेच पुढील पंधरा दिवसात राज्यातील सर्व धोकादायक पुलांची संरचनात्मक तपासणी करण्याचे कार्य सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राज्य शासन तयार करणार आहे. सावित्री नदीवर सध्या कार्यरत असलेल्या पूलावर वाहतुकीचा ताण येऊ नये यासाठी वेळेत नवीन पूल बांधण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment