रिक्षाचालकांचा ३१ आॅगस्टला संप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2016

रिक्षाचालकांचा ३१ आॅगस्टला संप

मुंबई : मुंबईतील अवैध वाहतुकीसह ओला व उबर यांसारख्या अ‍ॅग्रीगेटर्सवर तत्काळ बंदी आणावी, या मागणीसाठी ३१ आॅगस्टला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने संपाचा इशारा दिला आहे. युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.

राव म्हणाले की, अवैध वाहतुकीचे पुरावे देत युनियनने १५ फेब्रुवारी, २०१६ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे दिले होते. मात्र त्यानंतरही शासनाने युनियनची एकही मागणी पूर्ण केलेली नाही. शिवाय मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीसुद्धा झालेली नाही.
उपनगरांत टाटा सुमो, तवेरा, इंडिका आणि खासगी बसेसमधून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे धंदा करणाऱ्या आॅटोरिक्षा चालक आणि मालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने उपनगरांत अवैध वाहतूक फोफावली आहे. याशिवाय पूर्व आणि पश्चिम उपनगरांत हजारो रिक्षाचालक विनाबॅज रिक्षा चालवत आहेत. ज्या चालकांनी तीन वर्षांहून अधिक काळ रिक्षा चालवण्याचा परवाना मिळवला आहे, त्यांना विनाविलंब बॅज देण्यात यावा. त्यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांना सन्मानाने धंदा करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
ओला, उबर या अ‍ॅग्रीग्रेटर्ससाठी कायदे व नियम तयार करण्यात राज्य सरकार दिरंगाई करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राव म्हणाले की, १७ जून, २०१५ रोजी युनियनने केलेल्या आंदोलनानंतर सरकारने प्रारुप नियम (ड्राफ्ट रूल्स) तयार करत, त्यांवर ३१ आॅक्टोबर २०१५पूर्वी हरकती व सूचना मागविल्या होत्या. १० महिने उलटूनही अग्रीग्रेटर्ससाठी नियम अथवा कायदे लागू करण्यात आलेले नाहीत. एकीकडे रिक्षाचालकांवर कारवाई करायची, तरी दुसरीकडे कोणत्याही नियमाशिवाय रस्त्यावर वावरणाऱ्या अ‍ॅग्रीग्रेटर्सना अभय द्यायचे, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप राव यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad