मुंबई, दि. 2 : वेगळा विदर्भ करण्याचा राज्य शासनाचा कुठलाही प्रस्ताव राज्य शासन अथवा मंत्रीमंडळासमोर नाही. स्वतंत्र राज्याची निर्मिती हा विषय सर्वस्वीपणे केंद्र शासनाच्या तसेच संसदेच्या अधिकार अखत्यारितील बाब आहे, असे निवेदन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.
विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. भारतीय संविधानाप्रती प्रामाणिक राहण्याची शपथ मी यावेळी घेतली आहे. वेगळे राज्य करणे ही बाब राज्य शासनाच्या अधिकारात नाही, तो केंद्र शासनाच्या अखत्यारितील विषय आहे. स्वतंत्र राज्याची निर्मिती हा विषय सर्वस्वीपणे केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील आहे. जो विषय या सभागृहात झाला नाही, प्रलंबित देखील नाही त्यावर केवळ चर्चा करणे योग्य नाही, त्यामुळे आता या विषयाला पूर्णविराम द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment