मुंबई : कैद्याला रुग्ण भासवून हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेणे, त्याचबरोबर उच्च न्यायालयात अधिकाऱ्यांना धमकाविल्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे निलंबित मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र वाडीवाला यांची आझाद मैदान पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. त्याला तीन आॅगस्टपर्यत पोलीस कोठडी मिळाली असून या कालावधीत तपासाच्या अनुषंगाने जाबजबाब व आवश्यक पुरावे मिळविण्यात येतील, त्याचप्रमाणे आवश्यकता वाढल्यास कोठडीची मुदत वाढविण्यात येईल, असे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
डॉ. वाडीवाला हे मुंबई महापालिकेच्या १८ रुग्णालयाचे प्रमुख अधिकारी होते. या कालावधीत त्यांनी पदाचा गैरवापर करुन गंडगज माया कमाविली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याबाबत तक्रारी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कोट्यावधीचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या शंकर चंद्रशेखर या कच्चा कैद्याला जेजे रुग्णालयाऐवजी पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करुन घेण्यात डॉ.वाडीवाला याने महत्वपूर्ण भूमिका बजाविली होती. त्याचप्रमाणे नवीनचंद्र गंगाधर हेगडे (वय ६३) याची त्याने चंद्रशेखरशी ओळख करुन दिली होती. हेगडेला अटक केल्यानंतर याबाबतच्या अनेक बाबी पुढे आल्या असून डॉ.वाडीवालाला पालिकेतून निलंबित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment