मुंबई, दि. 11 : नैसर्गीक आपत्ती, हवामान बदल यासारख्या संकटातून शेतकऱ्यांना आर्थिक कवच देणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 45 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. लातुर विभागात सर्वाधिक 16 लाख 65 हजार शेतकऱ्यांनी तर त्या पाठोपाठ अमरावती विभागात 14 लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी योजनेस दि. 10 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यासाठी पाठपुरावा करून विमा कंपन्यांना निर्देश दिले होते.
खरीप हंगाम 2016 पासून राष्ट्रीय कृषि विमा योजना रद्द करून व्यापक स्वरूपातील प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी 2 ऑगस्ट ही अंतिम दिनांक देण्यात आला होता. मात्र ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या अर्ज भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर शेतकरी योजनेपासून वंचित राहू नयेत याचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे या योजनेस मुदत वाढ देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर 30 जुलै 2016 रोजी मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी विमा कंपन्यांच्या प्रतिनीधींची बैठकही घेतली होती.
राज्यामध्ये नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांकडून अगदी वेळेवर योजनेचे अर्ज उपलब्ध झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याने या योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीस अल्प कालावधी उरल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी विमा कंपन्यांनी मुदतवाढ द्यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिला होता. त्यानुसार केंद्र शासनाने राज्य शासनास योजनेस दि. 10 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्याचे मान्य केले.
या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची अंतरीम आकडेवारी कृषी आयुक्तालयाने जमा केली असून त्यानुसार कोकण विभागात 37 हजार शेतकरी, नाशिक विभागात 6 लाख 22 हजार, पुणे विभाग 3 लाख 74 हजार, कोल्हापूर विभाग 51 हजार, औरंगाबाद विभाग 7 लाख 99 हजार, लातूर विभाग 16 लाख 65 हजार,अमरावती विभाग 14 लाख, नागपूर विभाग 1 लाख 93 हजार असे राज्यभरातील 45 लाख 18 हजार शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत.
No comments:
Post a Comment