मुंबई, दि. 10 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील 2022 पर्यंत सर्वांना परवडणारी घरे देण्यात यावी या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी शासन कटिबध्द आहे,असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी आज येथे केले.
म्हाडाच्या योजनेतील विविध वसाहतीतील 972 सदनिकांसाठी 1 लाख 36 हजार 577 पात्र अर्जांची संगणकीय सोडत आज रंगशारदा नाट्यगृह, वांद्रे येथे काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, आमदार आशिष शेलार, उच्चस्तरीय देखरेख समितीचे अध्यक्ष माजी लोकायुक्त सुरेश कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे, कोकण विभागाचे मुख्य अधिकारी लहाणे तसेच म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी, सदनिकेचे अर्जदार आदी उपस्थित होते.
यावेळी महेता म्हणाले की, शासनाच्या दोन वर्षांतील ही म्हाडाची चौथी सोडत आहे. ‘एमएमआरडीए’कडून मंजूर झालेल्या 800 हेक्टर जमीनीवर मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करुन देण्यात येतील. पोलिसांना, गिरणी कामगारांना तसेच सामान्य जनतेसाठी स्वस्त व चांगली घरे देण्यास शासन तत्पर आहे. 16 हजार बीडीडी चाळीतील भाडेकरुंनाही स्वस्त व चांगली घरे देण्यात येतील. धारावी प्रकल्पासाठी शासन नव्याने प्रयत्न करणार आहे. तसेच शिवशाही प्रकल्पातून तसेच विकासकाकडूनही जनतेला स्वस्त दरात घरे देण्यात येणार आहेत.
म्हाडाच्या सदनिकेतील 972 विजेत्यांचे अभिनंदन करुन सर्वांना स्वस्त व चांगल्या दर्जाची सदनिका उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे श्री. वायकर म्हणाले. या सदनिकेतील सोडतीतील 350 जुनी घरे म्हाडातर्फे दुरुस्त करुन देण्यात येतील. एसआरएची बांधकामे उत्कृष्ट दर्जाची असावीत, याकडे शासन लक्ष पुरविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विकासकांनी नाहरकत प्रमाणपत्र मिळेपर्यंत भाडेकरुंना भाडे दिले पाहिजे. बीडीडी चाळीतील भाडेकरुंनाही स्वस्त घरे देण्यात येतील. प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वांना घरे देण्यासाठी गृहनिर्माण धोरणेबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत, असेही वायकर यांनी यावेळी सांगितले.
कमलेश चौहान, वर्षा माने, निलेश सबरदांडे हे तिघेजण सिध्दार्थनगर, गोरेगाव येथील पहिल्या ड्रॉ चे विजेते ठरले. स्वातंत्र्य सैनिक कुटुंबिय प्रवर्गात औरंगाबाद येथील विजय सिताराम पंत-खारकर यांना पवई येथे घर मिळाले. तसेच सैराटमधील सुमन अक्का भूमिकेतील अभिनेत्री छाया कदम,हेमांगी कवी, सुहास परांजपे या विजेत्या ठरल्या. उपस्थित भाग्यवान विजेते अँथोनी जॉर्ज कॉट्युनु यांना पुष्पगुच्छ देऊन महेता यांनी अभिनंदन केले. म्हाडाच्या mhada.maharashtra.gov.in तसेच lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावरुन विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment