मुंबई, दि. 11 : केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दरवर्षी सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत या सदभावना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 20 ऑगस्ट 2016 ते 5 सप्टेंबर 2016 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे.राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना सौदार्ह भाव वृद्धिंगत करणे व हिसाचार टाळणे ही प्रमुख उदिदष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत.
20 ऑगस्ट सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यासाठी या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात दिनांक 20 ऑगस्ट 2016 रोजी सदभावना दिवस साजरा करण्यात येणार असून यावेळी सर्व उपस्थितांना सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी सदभावना शर्यतही आयोजित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सदभावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहेत. महसूल विभागाच्या आयुक्तांमार्फत सदभावना शर्यत आयोजित करण्यासह त्यांच्या कार्यालयातून सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कार्यालये, जिल्हयांच्या मुख्यालयात व संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा घेणे, सर्व उपस्थितांना सदभावना शपथ घेण्यास सांगणे, सदभावना शर्यत आयोजित करणे, युवकांच्या सहभागाने सदभावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे सूचित करण्यात आले आहे. विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये सुध्दा अशाच तऱ्हेचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
20 ऑगस्ट 2016 ते 5 सप्टेंबर 2016 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यासाठीही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी मानवी साखळी सारखे कार्यक्रम राज्यातील जिल्हा मुख्यालयात, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी युवक परिषदा आयोजित करुन त्यामध्ये जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.सदर पंधरवडयात जिल्हयांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच बृहन्मुंबईत सांस्कृतिक संचालनालयामार्फत इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे सूचित करण्यात आले आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201608101118277914 असा आहे.
No comments:
Post a Comment