मुंबई, दि.10 Aug 2016 : राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेमध्ये घरकुल आवास योजनेसाठी सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणात ग्रामस्थांनी आपली नावे समाविष्ट करावीत असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
मंत्रालयातील त्यांच्या दालनात आयोजित आदिवासी विकास विभागाच्या घरकूल योजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, गृहनिर्माण विभागाचे सचिव श्रीकांत सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणात नावे समाविष्ट नसणाऱ्या दारिद्रय रेषेखालील आदिवासींना येत्या 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये नावे समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच ग्राामस्थांना तालुका स्तरावरील समितीकडे हरकती मागता येणार आहेत. त्यामुळे घरकूल लाभार्थ्यांना लाभ घेणे सुकर होणार आहे.
सन 2015-16 पासून पी.एफ.एम.एस. (पब्लिक फंड मॅनेजमेंट सिस्टम) द्वारे राज्यस्तरावरील एकत्रित खात्यातून इंदिरा आवास योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक, पोस्ट खात्यात जमा करण्यात आले आहे. पंतप्रधान आवास ग्रामीण योजनेअंतर्गत प्रतिघरकूलांना 1 लाख 20 हजार रुपये तसेच सलग प्रदेश व नक्षलग्रस्त, डोंगराळ प्रदेशासाठी 1 लाख 30 हजार रुपये अनुदान देणार असून या व्यतिरिक्त शौचालयासाठीही निधी देण्यात येणार आहे.
शबरी आवास योजनेसाठी आदिवासी विभाग आणि ग्रामविकास विभाग यांनी आदिवासी विकास विभागाच्या घरकूल योजनांचा आवास सॉफ्टवेअरमध्ये समावेश करुन घरकूल लाभार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने थेट लाभाचे वितरण करावे. ग्रामसभेमध्ये सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणाची प्रचार, प्रसिध्दी करण्याचेही निर्देशमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले. घरकूल योजनांमध्ये वीज बचतीसाठी सौर उर्जेचा वापर करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी संगितले.
No comments:
Post a Comment