मुंबई,दि.12 : प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे 15 ते 18 ऑगस्ट 2016 या कालावधी दरम्यान सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 55 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तर 19 ऑगस्ट 2016 रोजी राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या महोत्सवात 15 ऑगस्ट 2016 रोजी रात्री 8 वाजता मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते नाटक ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ हे नाटक सोनल प्रॉडक्शन,मुंबई या संस्थेतर्फे सादर करण्यात येणार आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी 7 वाजता हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते नाटक ‘असूरवेद’ हे कलासाधना, मुंबई हे सादर करणार आहे.दिनांक 17 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वाजता बालनाट्य स्पर्धेतील ‘डराव डराव’ हे नाटक ज्ञानदीप कलामंच, ठाणे ही संस्था सादर करणार असून याच दिवशी दुपारी 12.30 वाजता संस्कृत नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते ‘अक्षगानम्’ हे नाटक महाराष्ट्र सेवा संघ, मुंबई ही संस्था सादर करणार आहे. दिनांक 18 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी 7 वाजता संगीत नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते ‘संगीत शारदा’ हे नाटक देवल स्मारक समिती, सांगली ही संस्था सादर करणार आहे.
शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वाजता नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल. यावेळी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येईल.
व्यावसायिक नाटकासाठी तिकिट दर रुपये 30 व रुपये 50 असून महोत्सवातील इतर सर्व नाटके व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम विनामूल्य आहे. या नाट्य महोत्सवास व पारितोषिक वितरण समारंभास उपस्थितीत रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment