मुंबई, दि. 28 : ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला मराठवाड्यासह राज्यभरात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच या योजनेला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे असे रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी मराठवाड्यात‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना संथगतीने सुरु असल्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. रावल म्हणाले की, ‘मागेल त्याला शेततळे’या योजनेंतर्गत मराठवाड्यातील 38 हजार 393 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी 15 हजार 770 कामांना मंजुरी देण्यात आली असून मंजुरी दिलेल्या कामांपैकी 12 हजार 705 कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. सध्या 1 हजार 811 कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून 1 हजार 644 कामे अंतिम टप्प्यात आहेत, तसेच मागील काळाच्या तुलनेत गेल्या 5 महिन्यात 6 हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निधीची कमतरता नाही
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत मराठवाड्यातील आतापर्यंत 945 शेतकऱ्यांना 434.73 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पुढील काळात मुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचे नियोजित केले आहे. त्यामुळे ‘मागेल त्याला शेततळे’ ह्या योजनेसाठी निधीची कमतरता नसून अर्ज करेल त्या शेतकऱ्याला शेततळे देण्यात येईल. त्याचबरोबर शेततळ्यांच्या कामांसाठी रोजगार हमी योजनेतून 5 लाख रुपयांचे अनुदान दिले जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, अजित पवार, शंभूराज देसाई,गणपतराव देशमुख, प्रकाश आबिटकर, विजय वडेट्टीवार यांनी चर्चेत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment