मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते विरार आणि मध्य रेल्वेच्या हार्बरवरील सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड (उन्नत) प्रकल्प ट्रॅकवर येण्यास सुरुवात झाली आहे. या दोन्ही प्रकल्पांचे प्राथमिक अहवाल एमआरव्हीसीने एक आठवड्यापूर्वीच रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सादर केले आहेत. त्या अहवालावर रेल्वे आणि राज्य सरकारकडून लवकरच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा एमआरव्हीसीने व्यक्त केली आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत मुंबई रेल्वेच्या विविध प्रकल्पांवर चर्चा केली. या वेळी चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. यात प्रथम वांद्रे ते विरार आणि त्यानंतर वांद्रे ते चर्चगेट प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर, सीएसटी ते पनवेल रेल्वे आणि रोड असा मल्टिमॉडल एलिव्हेटेड कॉरिडोरही बांधण्यात येणार असून, त्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली होती. दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्प एमआरव्हीसीच्या अखत्यारित येत असल्याने, त्यांनी या प्रकल्पांचे सुधारित प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्पांचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे एक आठवड्यापूर्वी पाठवण्यात आल्याची माहिती एमआरव्हीसीचे प्रवक्ता प्रभात रंजन यांनी दिली.
No comments:
Post a Comment