मुंबई, दि. 20 : जलजन्य आणि कीटकजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण आणि परिसर स्वच्छता यासंदर्भातील आपली जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पार पाडावी. तसेच राज्यात पावसाळ्यात डेंग्यूच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. पावसामुळे मुंबईत लेप्टोचे रुग्ण वाढण्याची शक्यता असून मुंबई महानगरपालिकेने साथ नियंत्रणासंदर्भात सर्व संबधितांची बैठक घ्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिले.
मंत्रालयात साथरोग प्रतिबंध आणि नियंत्रण समितीच्या बैठकीत डॉ.सावंत बोलत होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध आणि नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष साळुंखे, आरोग्य संचालक डॉ.मोहन जाधव, सहसंचालक डॉ.कांचन जगताप, मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी डॉ.पद्मजा केसकर, राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्थाचे सहायक संचालक डॉ.संकेत कुलकर्णी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.
डॉ.सावंत म्हणाले, राज्यात मलेरियाचे प्रमाण गत वर्षाच्या तुलनेने निश्चितपणे घटले आहे. पावसामुळे मुंबईत लेप्टोचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. पाळीव प्राण्यांच्या मुत्रावाटे लेप्टो आजाराचा प्रसार होत असल्याने गाई-गुरांचे गोठे, घोड्यांचे तबेले यांची स्वच्छता राखणे आवश्यक असून पाळीव प्राण्यांना लेप्टो प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे.
राज्यात इन्फ्लुएन्झा लसीकरण नियमित कार्यक्रम सुरु असून महानगरपालिकांनी आपल्या निधीतून लस खरेदी करावी. अनेक वेळा इन्फ्लुएन्झा या आजाराचा स्वाईन फ्ल्यू असा उल्लेख करण्यात येतो. इन्फ्लुएन्झा विषाणूचे अनेक प्रकार,उपप्रकार असून त्यांना स्वाईन फ्ल्यू म्हणून संबोधने चुकीचे आहे. तसेच नवजात अर्भकाला जन्मानंतर आधार क्रमांक मिळावा याकरिता यंत्रणा विकसित करावी. तसेच नवजात अर्भकाला जन्मानंतर चोवीस तासाच्या आत द्यावयाच्या सर्व लसी वेळेवर मिळण्याबाबत सर्व स्तरावरील यंत्रणेने विशेष काळजी घ्यावी, असेही डॉ.सावंत यांनी यावेळी सांगितले
No comments:
Post a Comment