बृहन्मुंबई क्षेत्रात महापालिकेकडून सुमारे सहा हजार वृक्षांची लागवड
सुमारे दहा हजार वृक्षरोपटय़ांचे केले वाटप
‘हरित मुंबई – स्वच्छ मुंबई’ साठी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा – महापौर
कृषि दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपण मोहीम राज्य शासनाने हाती घेतली असून यानिमित्त झालेल्या शुभारंभदिनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बृहन्मुंबईत सुमारे ६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘हरित मुंबई – स्वच्छ मुंबई’ करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांनी केले. महानगरपालिकेकडून ०१ ते ३० जुलै दरम्यान मोफत वृक्षारोपटय़ांचे वाटप २४ विभाग कार्यालयात उद्यान विभागाकडून करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत आज बृहन्मुंबई क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला. आज (दिनांक ०१ जुलै, २०१६) महापौर निवासस्थान,शिवाजी पार्क, दादर येथे महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उद्यान अधीक्षक व वृक्ष प्राधिकारी जितेंद्र परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी विलास गवळी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या उद्यान विभाग व विभागीय कार्यालयाद्वारे आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे सुमारे २३० ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे दिनांक ०१ ते ३० जुलै दरम्यान विभागीय कार्यालयांकडे जी सोसायटी ५ वृक्षांपेक्षा अधिक वृक्षरोपण करणार आहेत, त्यांना महापालिका वृक्षारोपण करुन देणार आहे. तरी त्यांनी विभागीय कार्यालयाच्या सहाय्यक उद्यान अधीक्षक यांच्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे.
आज झालेल्या वृक्षरोपण कार्यक्रमात शाळा, उद्याने,मोकळी मैदाने, मनोरंजाची मैदाने, कार्यालये, राज्य व केंद्रांच्या विविध संस्था यांच्या आवारात बहावा, तामण, करंज, नागचाफा, सातवीण, बकुळ, समुद्रफुल, पुत्रंजीव, कडुनिंब या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. बृहन्मुंबई क्षेत्रात अधिकाधिक वृक्षरोपण करण्याचा संकल्प महापालिकेने केले असल्याचे उद्यान अधीक्षक व वृक्ष प्राधिकारी जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment