मुंबई, दि. 25 : अन्नातील भेसळ रोखण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर रसायनांचा साठा जप्त करण्यासंदर्भातला प्रश्न विधानसभा सदस्य भारत भालके, अजित पवार, डॉ. पतंगराव कदम, गणपतराव देशमुख, राधाकृष्ण विखे पाटील, ॲङ आशीष शेलार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना बापट यांनी सांगितले की, 17 एप्रिल 2016 रोजी मे.श्रीराम दूध संकलन केंद्र येथे छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी दूध संकलन केंद्रातून दूध विक्रीसाठी रवाना झाले होते. मात्र तेथे लॅक्टोज पावडर, ड्राईड ग्लुकोज सिरप, रिफाईंड कॉटनसाड ऑईल हे पदार्थ आढळल्याने संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित मालकाकडे दूध विकण्याचा परवाना नसतानाही दुधाची विक्री करीत असल्याने त्या मालकावर वेगळा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अन्नातील भेसळ रोखली जावी यासाठी राज्य शासनामार्फत कठोर पावले उचलली जात असून याअंतर्गतच आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. सदर समिती अन्न भेसळ रोखण्याबाबत नियमांचे पालन करणार आहे. भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा मिळावी यासाठी राज्य शासनामार्फत विशेष वकीलांची नेमणूक करण्यात आली असून न्यायालयात चालणाऱ्या यासंदर्भातील खटल्यांसाठी वकीलांचे एक विशेष पॅनेलही तयार करण्यात आले आहे, अशी माहिती बापट यांनी यावेळी दिली.
अन्न भेसळ करणा-यांविरोधातील गुन्हे अजमीनपात्र गुन्ह्यात वर्ग करण्यात यावे, असा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. याशिवाय राज्यभरात भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली असून भरारी पथकांना तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी मुंबईत 1,253 दुधाचे नमुने तपासण्यात आले यापैकी 833 प्रमाणित निघाले आहेत तर याबाबत 93 नमून्यांचे अहवाल येणे बाकी आहे. भरारी पथकाने 48 धाडी टाकल्या असून यामध्ये 55 व्यक्तींना अटक केली आहे.539 टँकरचीही तपासणीही करण्यात आली असल्याचे श्री. बापट यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment