महापालिका आयुक्तांची उपायुक्तांसोबत आढावा बैठक संपन्न
मुंबई / प्रतिनिधी
ब्रीमस्टोवाड आणि बिगर ब्रीमस्टोवाड अंतर्गत करावयाच्या नाला रुंदीकरणाच कामात नाल्यालगतची अनधिकृत बांधकामे हा फार मोठा अडथळा आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी ही बांधकामे हटविण्याचा कृती आराखडा सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी संचालक (अभियांत्रिकी - सेवा व प्रकल्प) लक्ष्मण व्हटकर यांना दिले होते, याबाबतचा कृती आराखडा त्यांनी आजच्या बैठकीत सादर केला.
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सर्व परिमंडळाच्या उपायुक्तांची आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम) आय. ए. कुंदन यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, विभाग प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत पावसाळ्या दरम्यान पाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी महापालिका अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली व विविध यंत्रणांमध्ये सु-समन्वय साधला; ज्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा गेल्यावर्षी पेक्षा कमी वेळेत झाला, या बाबीचा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आवर्जून उल्लेख केला. यापुढेही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभागातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो ना? याची नियमितपणे पाहणी करावी. पाणी साचणा-या जागा, तेथील स्वच्छता व पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी विशेष काळजी घ्यावी अशाही सूचना त्यांनी उपायुक्तांना केल्या.
अंमलबजावणीच्या दृष्टीने प्राधान्यक्रमांक १ आणि प्राधान्यक्रमांक २ असे भाग करण्यात आले आहेत. सर्व संबंधितांनी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पूर्वतयारी करायची असून अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी त्यांच्या पात्रते विषयी सप्टेंबर अखेर पर्यंत निर्णय घ्यायचा आहे. पात्र असलेल्यांना पर्यायी जागा देण्याचाही निर्णय सप्टेंबर पूर्वी घेऊन संबंधितांना कळविणे आवश्यक आहे
या प्राधान्यक्रमांक १ मधील नाल्यांवरील कामांचे बहुतेक कार्यादेश देण्यात आलेले असून राहिलेले कार्यादेश सप्टेंबर – २०१६ पर्यंत दिले जाणार आहेत.१ ऑक्टोंबर पासून अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरु व्हायला हवी. ब्रीमस्टोवाड कामांतर्गत प्राधान्यक्रमांक १ मध्ये ६१.३१ किलोमीटर नाल्यांपैकी १९.७० किलोमीटर नाल्यांचा भाग अतिक्रमीत आहे. यात ११ हजार १४३ अतिक्रमीत / प्रभावित बांधकामे आहेत. बिगर ब्रीमस्टोवाड कामांतर्गत प्राधान्यक्रम १ मध्ये ७०.४३ किलोमीटर नाल्यांपैकी पैकी १९.६६ किलोमीटर नाल्याचा भाग अतिक्रमीत आहे. त्यात ६ हजार ३२ अतिक्रमणे आहेत
प्राधान्यक्रम १ मधील ब्रीमस्टोवाडचा तपशीलः शहर ६५१, पश्चिम उपनगरे - ६ हजार २६१ आणि पूर्व उपनगरे - ४ हजार २३१. एकूण ११ हजार १४३ अतिक्रमणे आहेत. प्राधान्यक्रम १ मधील बिगर ब्रीमस्टोवाडमधे शहर ०, पश्चिम उपनगरे ३ हजार ३१८, पूर्व उपनगरे १ हजार ५६० आणि मिठी नदी १ हजार १५४. एकूण ६ हजार ३२ अतिक्रमणे आहेत. ब्रीमस्टोवाड मध्ये १३ हजार ४९८ आणि बिगर ब्रीमस्टोवाड मध्ये १३ हजार ७१५ असे एकूण २७ हजार २१३ अतिक्रमणे आहेत. हे क्षेत्र ५९.६९ किलोमीटर एवढे आहे
No comments:
Post a Comment